सोयगाव : कोविड लसीकरण आता गाव पातळीवर देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. बुधवारपासून तालुक्यातील जरंडी, बनोटी आणि सावळदबारा या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. मात्र, येथील केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांची कमी असल्याने शुक्रवारी बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ तीन जणांना लस टोचण्यात आली. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा आरोग्य विभागाचा सावळागोंधळ समोर आला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण मोहीम तालुक्यात सुरू झाली आहे. तीन दिवसापासून तालुक्यात गावपातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस पोहचली आहे. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्याच दिवशी ५० जणांना लसीकरण करण्यात आले. परंतु जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातही आरोग्य कर्मचारी संख्या कमीच पडली. बनोटीला तर केवळ तीन व्यक्तींना शुक्रवारी लस दिली गेली. तर रुग्णालयात जवळपास सत्तर ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता व नोंदणीच्या अभावाने नागरिकांना रिकाम्या हाताने घरी पोहचावे लागले.