छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावातून ६-७ वर्षाच्या मुलाला घेऊन एक पिता घाटीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाला. त्यांनी त्यांच्या चिमुकल्याला लहानपणापासून मुलासारखे वाढवले. परंतु ‘तो’ आहे की ‘ती’ हेच समजत नाही. कारण जन्मापासूनच अस्पष्ट जननेंद्रिय ही एक दुर्मिळ स्थिती आहे. या समस्येला सामोरे जाणारे ते काही एकमेव पिता नाहीत. आता घाटी रुग्णालयातील डाॅक्टर्स अशी संभ्रमावस्था दूर करण्याची शस्त्रक्रिया करून मुलगा अथवा मुलगी ओळख देणार आहेत.
जन्मानंतर मुलगा झाला, मुलगी झाली, असे सांगून आनंद व्यक्त केला जातो. परंतु काहींच्या बाबतीत असे होत नाही. कारण जन्मानंतर मूल मुलगा आहे की मुलगी; हे स्पष्टच होत नाही. काही बालकांमध्ये जन्मानंतर लगेच निदान करता येते, तर बऱ्याच बालकांना वयात येताना ११ ते १४ वयोगटात शारीरिक व मानसिक बदल जाणवतात. अशा वेळी मुलगा म्हणून वाढलेला मुलगी आणि मुलगी म्हणून वाढलेला मुलगा असू शकते. हा वैद्यकीय क्षेत्रातील दुर्लक्षित आजार असून त्यासंदर्भात आता घाटी रुग्णालयातही शस्त्रक्रिया शक्य होणार आहे. मराठवाड्यासह लगतच्या भागातील गोरगरीब जनतेसाठी हे वरदान ठरेल.
अस्पष्ट जननेंद्रिय म्हणजे काय?अस्पष्ट जननेंद्रिय ही एक दुर्मिळ स्थिती आहे, ज्यामध्ये जन्मानंतरही बाळाचे बाह्य जननेंद्रिय स्पष्ट होऊ शकत नाही. अस्पष्ट जननेंद्रिय असलेल्या बाळामध्ये गुप्तांग अपूर्ण विकसित होऊ शकतात किंवा बाळामध्ये दोन्ही लिंगांची वैशिष्ट्ये असू शकतात.
किती जणांमध्ये ही अवस्था?तब्बल ५ हजार शिशूंमागे एकामध्ये अस्पष्ट जननेंद्रिय, अशी अवस्था असते. विविध तपासण्यांतून बालक आहे की बालिका आहे, याचे निदान होते. निदान झाल्यानंतर शरीरातील भाग वापरून शस्त्रक्रियेद्वारे जननेंद्रिय विकसित केले जाते.
मुलांना कळण्याच्या आत उपचार घ्यावाअस्पष्ट जननेंद्रियाची अवस्था असेल तर मुलांना कळण्याच्या आत उपचार करावेत. मुले मोठी झाल्यानंतर अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अस्पष्ट जननेंद्रिय असलेले बालक हे विविध तपासणीनंतर मुलगा की मुलगी आहे, याचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करता येते. घाटीत अशी शस्त्रक्रिया आता करणे शक्य होईल.- डाॅ. व्यंकट गीते, मूत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, घाटी