कोरोना काळात काँग्रेस सक्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस दिसतेय निष्क्रिय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 07:51 PM2020-09-02T19:51:22+5:302020-09-02T19:53:04+5:30
ऐन कोरोना काळातच जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेसच्या नेतृत्वात बदल झाले.
- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद : कोरोना काळात काँग्रेस सक्रिय, तर राष्ट्रवादी काँग्रेस निष्क्रिय झाल्याचे चित्र निदान औरंगाबाद शहरात व जिल्ह्यात दिसून येत आहे. ऐन कोरोना काळातच जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेसच्या नेतृत्वात बदल झाले. नवे नेतृत्व उमेदीने कामाला लागलेले दिसते आहे.
काँग्रेस अलीकडे रस्त्यावर उतरून आंदोलनेही करीत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर काँग्रेसने जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. यापूर्वी पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तालुका पातळीवर जाऊन निदर्शने केली. केंद्र, प्रदेशकडून काँग्रेसला सतत कार्यक्रम दिले जात आहेत. हे कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी त्या-त्या जिल्ह्याच्या व शहराच्या अध्यक्षांवर येऊन पडते.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कोरोनाच्या काळात शांत जाणवत आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शहरात दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी होते हा भाग निराळा; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेसच्या तुलनेत कमीच कार्यक्रम दिसून येत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे हे राष्ट्रवादीचे. यांचा मतदारसंघ संपूर्ण मराठवाडा जरी असला तरी त्यांचे वास्तव्य औरंगाबादेत आहे. हे दोघेही आमदार सध्यातरी पक्षाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात फारसे सक्रिय नसल्याचे दिसते. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास पाटील हे वेळ मिळेल तसे राष्ट्रवादी भवन पक्ष कार्यालयात बसतात. शहराध्यक्ष विजय साळवे यांचा प्रारंभी उत्साह होता; परंतु आता ते सक्रिय नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कदीर मौलाना यांच्या शिफारसीने विजय साळवे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन साळवे यांना बदलण्यात यावे व त्यांच्या जागी मुस्लिम शहराध्यक्ष नेमावा असा सूर वाढला असल्याचे कळते.
काँग्रेसच्या विविध आघाड्याही कार्यरत
काँग्रेसच्या विविध सेल विभागाचे कार्यक्रमही सध्या वाढलेले आहेत. काँग्रेसच्या दिव्यांग सेलतर्फे दिव्यांगांचे प्रश्न ऐरणीवर आणले गेले, तर काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने निदर्शने करून उत्तर प्रदेशात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना झालेल्या अटकेचा निषेध नोंदवला.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित राहून वाटेत औरंगाबाद मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व नंतर पत्रकारांशीही संवाद साधला. शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न घेऊन विविध शिष्टमंडळेही त्यांना भेटली. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मंत्री कोरोना काळात औरंगाबादकडे फिरकला नाही. अपवाद फक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा.