औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर आता काँग्रेसनेहीऔरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून हात वर केले आहेत. काँग्रेसचे नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज औरंगाबादेत एका कार्यक्रमात आले असता, पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या अजेंड्यावर संभाजीनगरचा विषय नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमातही हा मुद्दा नव्हता, असे स्पष्ट केले.
१० आणि ११ जुलै रोजी शरद पवार औरंगाबादेत होते. त्यांनीही अशीच भूमिका घेऊन हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणण्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली नव्हती, असे म्हटले होते. आज बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळेवर हा विषय चर्चेसाठी आणला. खरे तर हा विषय धर्माच्या पातळीवर जाता कामा नये. आता नामांतराची चर्चा न होता विकासाच्या मुद्द्यांची चर्चा व्हायला हवी, औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. रस्त्यांचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.शेवटची कॅबिनेट झाली, तेव्हा महाराष्ट्रात पावसाचा जोर नव्हता. दुष्काळ पडेल की काय, अशी शक्यता होती. त्यामुळे आम्ही या प्रश्नावर चर्चा व्हावी, या मताचे होतो. परंतु घाई गडबडीत संभाजीनगरचा मुद्दा आला आणि तो मंजूर करून घेतला गेला, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचीहीएकनाथ शिंदे सरकारही आता घाईगडबडीतच निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात यांनी आरोप केला की, सत्ता मिळवण्यासाठी काहीही करायचे हे लोकशाहीसाठी घातक आहे. शेवटी सत्ता कशी मिळवली, याचा इतिहास लिहिला जातो. तसेच या देशातील लोकशाही टिकली पाहिजे, याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचीही आहेच.
मतभेद असतातचमहाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची कामे होत नव्हती, या तक्रारीत तथ्य आहेच ना, असे विचारले असता, थोरात उद्गारले, एकाच पक्षाचे सरकार असताना मतभेद असतात. आमचं तर तीन पक्षांचं सरकार होतं आणि सर्वच कामं होतच असतात, असंही नाही. त्याला थोडा काळही जाऊ द्यावा लागतो.