औरंगाबाद : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा चेहरा सोशल मीडियाने बदलवून टाकला. नेटेजियन्सला आकर्षित करण्यात भाजपा यशस्वी ठरली. मात्र, सोशल मीडियापासून दूर राहणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला महागात पडले. यूपीए सरकारने मागील १५ वर्षांत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या; पण त्याचे प्रभावीपणे मार्केटिंग झाले नाही, यापासून धडा घेत विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे विचार राजकीय पक्षातील नेते, तज्ज्ञांनी व्यक्त केले. १६ व्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. अमेरिकेच्या फेसबुक, व्हॉट्सअप, टिष्ट्वटर आणि गुगल या साईटचा राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी चांगल्या पद्धतीने वापर केला. ब्रेकिंग न्यूज, एकमेकांच्या विरोधात बातम्या पसरविण्यासाठी या माध्यमांचा वापर केला. उल्लेखनीय म्हणजे सुरुवातीच्या काळात संगणकाला विरोध करणार्या भाजपाने या सोशल मीडियाचा नियोजनबद्ध पद्धतीने व खुबीने वापर करून निवडणुकीत कमी कालावधीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आपले विचार पोहोचविले. पारंपरिक पद्धतीने प्रचार करण्यात अडकून राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा तोटा सहन करावा लागला. प्रचार यंत्रणेत पक्ष कमी पडला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात कमी पडले, हे सत्य आहे. कारण, सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक युवा मतदार करतात. भाजपाने हे माध्यम वेळीच हेरून आपली प्रचार यंत्रणा अपग्रेड केली. मोदी यांनी सोशल मीडियाचा जबरदस्त वापर करून युवा मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. यापासून धडा शिकत येत्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उमेदवारांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणे काळाची गरज आहे. -आ. सतीश चव्हाण भाजपाला यश सोशल मीडियामुळेच सोशल मीडियाने या निवडणुकीत प्रभावीपणे काम केले आहे. यापुढील निवडणुकीत सोशल मीडियाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. याचा वापर भाजपाने उत्तमपणे केला. सोशल मीडियाची विंग तयार केली व ७५ टक्के प्रचार या आधुनिक माध्यमातून केला. तसेच थ्रीडी सभांद्वारे एकाच वेळी शेकडो शहरांत सभा घेतल्या. या सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करणे हेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला महागात पडले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करावा, असे पक्षातील नेत्यांना मी सांगितले होत. -सुधाकर सोनवणे, जिल्हाध्यक्ष, राकाँ अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून घेतला धडा जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी करा यासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन केले. या आंदोलनाच्या यशस्वीतेमध्ये सोशल मीडियाने मोठी भूमिका बजावली. या आंदोलनात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. त्याच वेळी भाजपाला सोशल मीडियाचे महत्त्व कळाले व लोकसभा निवडणुकीत याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी त्यांनी वेगळी फौजच तयार केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियाचा मोठा वापर करण्यात आला. यूपीएने घेतलेल्या काही कठोर निर्णयांमुळे देशात नाराजी पसरली होती. यापुढे काँग्रेस व राष्ट्रवादीनेही या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचार केल्यास पुढील निवडणुकीत चित्र वेगळे दिसेल. -मुकुंद कुलकर्णी, माजी अध्यक्ष, सीएमआयए सोशल मीडियाचा प्रभाव काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पारंपरिक पद्धतीने प्रचार करण्यावर भर दिला. मुळात या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. संस्थात्मक राजकारण दोन्ही पक्षांचा पाया आहे. येथेच हक्काचे मतदान त्यांना मिळते. मात्र, त्या पलीकडील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे गैर नाही. भाजपाने सोशल मीडियाच्या वापरासाठी ४ हजार लोकांची टीम तयार केली होती. त्याद्वारे देशातील कानाकोपर्यात पक्षाचे मार्केटिंग केले. -प्रा. जयदेव डोळे, राजकीय विश्लेषक सक्षमीकरणासाठी प्रयत्न नवीन १०० टक्के मतदार हा सोशल मीडियावर अॅक्टिव्हेट होता. आम्ही औरंगाबाद जिल्ह्यात सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला. मात्र, पक्षाने यशस्वीपणे राबविलेल्या योजनांची संपूर्ण माहिती वेळेवर आपल्या हातात न आल्याने ती माहिती लोकांपर्यंत वेळेत पोहोचवू शकलो नाही. वेळोवेळी माहिती पुरविण्यासाठी सोशल मीडिया टीमची आवश्यकता असते, अशा प्रभावी टीमचा अभाव राज्यस्तरावर दिसून आला. येत्या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची मानली जाईल. यासाठी आम्ही आमची सोशल मीडिया विंग सक्षम करण्यासाठी कामाला लागलो आहोत. याचा सकारात्मक परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येईल. -डॉ. पवन डोंगरे, सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सोशल मीडिया कोर टीम
काँग्रेस, राष्ट्रवादी मार्केटिंगमध्ये कमी पडले
By admin | Published: May 19, 2014 1:24 AM