औरंगाबाद: ‘शरम करो मोदी’ आंदोलनांतर्गत आज क्रांती चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नूतन काॅलनीतील निवासस्थानाकडे निघालेला कॉंग्रेसचा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला. दुपारी दीडच्या सुमारास आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा करुन दिला.
खुद्द पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या उपस्थितीत पोलिसांनी मोर्चा अडवून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना कराड यांच्या घरापर्यंत पोहचूच न दिल्याने कॉंग्रेस आणि भाजप असा संघर्ष टळला. अन्यथा कॉंग्रेसचे व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले असते. शहर कॉंग्रेसचे निरीक्षक ॲड. मुजाहिद खान, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी राज्यमंत्री अनील पटेल,महिला काॅंग्रेसच्या हेमा पाटील, प्रदेश सचिव सरोज मसलगे, कृउबा अध्यक्ष जगन्नाथ काळे आदींनी मोर्चात सहभाग घेऊन घोषणा दिल्या.कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अतिश पितळे, उपाध्यक्ष नारायण पारटकर, शहराध्यक्ष दर्शनसिंग मलके यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालेले दिसले.
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे कळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. कराड यांच्या कार्यालयाजवळ भाजपचे कार्यकर्ते सकाळपासून बसले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त पहायला मिळाला. या निमित्ताने या रोडवर वाहतूक मात्र बंद ठेवावी लागली.