- स. सो. खंडाळकर
छत्रपती संभाजीनगर : बहुचर्चित औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवृत्त शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्या उमेदवारीस महाविकास आघाडी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून तीव्र विरोध झाल्यानंतर रविवारी तातडीने काँग्रेसने देशमुख यांच्याऐवजी लहुजी शेवाळे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने धनगर-ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, ही भावना होती. या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होत असल्याने शेवाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना समाधान व्यक्त केले.
शेवाळे म्हणाले, मी पक्षाकडे रीतसर उमेदवारी मागितली नव्हती, परंतु ओबीसी व धनगर समाजाला काँग्रेसने प्रतिनिधित्व द्यावे, हा आग्रह होता. तो या निमित्ताने पूर्ण होत असल्याने मला आनंद होत आहे.पाच वर्षांपासून लहुजी शेवाळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. २००९ पासून ते स्वत:ची मल्हार सेना ही संघटना चालवत आहेत. या संघटनेमार्फत २०२२ साली त्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर ते जालना अशी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. धनगर समाज एसटीतच असून त्याची अंमलबाजवणी करावी, अशी त्यांची भूमिका आहे, तसेच या मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्रातून ११ लाख पत्रे शासनाला पाठविली होती. कोकणवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविल्यापासून दरवर्षी मल्हार सेनेतर्फे जयंतीनिमित्त पैठण गेट ते कोकणवाडी अशी मिरवणूक काढली जाते. राज्यस्तरीय डफ स्पर्धा घेतली जाते. ओबीसींच्या प्रश्नांवरच्या लढाईत लहुजी शेवाळे प्रारंभापासून आहेत. शिवाय २०२३ साली राज्य सरकारने ओबीसी व भटक्या विमुक्त प्रश्नांवरच्या त्यांच्या कामाची पावती डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन केलेली आहे.
मुस्लीम उमेदवार देण्याचा होता आग्रहऔरंगाबाद पूर्वची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटली आहे. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी असल्याने काँग्रसने मुस्लीम उमेदवार द्यावा, असा आग्रह होता, परंतु अचानक काँग्रेसच्या यादीत पक्षाचे सदस्यही नसलेले निवृत्त शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांचे नाव आले आणि खळबळ उडाली. देशमुख यांच्या नावाला मुस्लीम कार्यकर्त्यांचा, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा तीव्र विरोध होता.
शरद पवार गटाने दिले होते बंडखोरीचे संकेतकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारीच गांधी भवनासमोर काही वेळ ठिय्या आंदोलन करून देशमुख यांची उमेदवारी बदलण्याची मागणी केली, तर शरद पवार गटाने पूर्वमधून बंडखोरी करण्याचे संकेत दिले. शेवटी देशमुख यांना बदलून लहुजी शेवाळे यांचे नाव फायनल झाले. काँग्रेसने एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला अशा पद्धतीने ही संधी दिल्याचे दुर्मीळ उदाहरण होय.