महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला न्यायच मिळत नाही; अमित देशमुख यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 12:10 PM2022-01-25T12:10:51+5:302022-01-25T12:13:01+5:30

एखाद्याची हवा असेलही, पण ती फार काळ टिकणार नाही, हे लक्षात ठेवा.

Congress does not get justice in Mahavikas Aghadi government; Amit Deshmukh's attack | महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला न्यायच मिळत नाही; अमित देशमुख यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला न्यायच मिळत नाही; अमित देशमुख यांचा हल्लाबोल

googlenewsNext

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या मित्रपक्षांमध्ये मोठी स्पर्धा आहेच, पण यात काँग्रेसला न्याय मिळत नाही. ठरलेल्या सूत्रांनुसार वाटा मिळत नाही, असा हल्लाबोल सोमवारी येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी चढवला. जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित डिजिटल सदस्य नोंदणीकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते चिकलठाणा एमआयडीसीतील सागर रिसोर्टमध्ये बोलत होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्यात विलंब होतोय याची कबुली देत, पण याचा विसर पडलेला नाही, याची जाणीवही यावेळी त्यांनी करून दिली.

भाजपमध्ये वगैरे जाण्याचा अजिबात हेतू नाही. काँग्रेसलाच गतवैभव प्राप्त करून देऊ, असा शब्द यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दूध संघाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिला. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारणापेक्षा ‘सहकार’ महत्त्वाचा असतो. त्यामुळे माझ्यापर्यंतही तक्रारी आल्या, पण या निवडणुकीत कल्याण काळे यांनी जे काही केले ते चुकीचं केलं, असं वाटत नाही, अशा शब्दांत अमित देशमुख यांनी काळे यांना क्लीन चिट देताच काळे यांच्या जिंदाबादच्या घोषणा निनादल्या. यावेळी दूध संघाच्या नवनिर्वाचित काँग्रेसच्या संचालकांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. काळे हरफन मौला आहेत. काँग्रेसच्या दृष्टीने जिल्हा कमकुवत आहे, पण त्याला काळेच उभारी देऊ शकतील. याबद्दल शंकाकुशंका असतील असं वाटत नाही, असे सांगत व पाठीमागे वळून बघत देशमुख यांनी, यासाठी लाल सोफ्यावर बसलेल्यांमध्येसुद्धा समन्वय हवा, असा टोमणा मारताच सभागृहात हंशा पिकला.

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस संपल्यागत आहे. तिला ताकद द्या, अशी विनंती यावेळी बोलताना ग्रामीणचे निरीक्षक आमदार शिरीष चौधरी यांनी देशमुख यांना केली. जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलासबापू औताडे, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा हेमा पाटील, नामदेव पवार, ॲड. सय्यद अक्रम, डॉ. जितेंद्र देहाडे, खालेद पठाण, रमेश पा. डोणगावकर, किरण पा. डोणगावकर आदींची मंचावर उपस्थिती होती. राहुल सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

एखाद्याची हवा असेलही, पण ती फार काळ टिकणार नाही
महाविकास आघाडीचं सरकार येऊन दोन वर्षे झाली, पण औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, असं मला जाणवत नाही असे स्पष्टपणे नमूद करीत देशमुख म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या संघटनेचे नाव काँग्रेस आहे. आज काँग्रेसचा इतिहास पुसून टाकण्यात येत आहे. एखाद्याची हवा असेलही, पण ती फार काळ टिकणार नाही, हे लक्षात ठेवा. सर्वधर्मसमभावाचा विचार बाजूला पडत आहे. एक विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्याच्या निवडणुका व्हाॅट्सॲप व फेसबुकवरच होतील. सध्या तरी हे माध्यम मोफत आहे. फिडबॅक घेण्याचं हे माध्यम आहे. नव्याने राजकारणात आलेल्यांना यांचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी दिला.

Web Title: Congress does not get justice in Mahavikas Aghadi government; Amit Deshmukh's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.