औरंगाबाद, दि. २२ : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे (काँग्रेस) यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी आणलेला अविश्वास ठराव पास झाला आहे. काँग्रेसचे ३ संचालक फोडण्यात भाजपाला यश आले असून १३ विरुद्ध शून्य एवढ्या फरकाने औताडे यांना पदावरून पाय उतार व्हावे लागले.
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात मागील ११ आॅगस्ट रोजी उपसभापती (भाजपा) भागचंद ठोंबरे यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. जिल्हाधिका-यांनी आज मंगळवारी या प्रस्तावावर विशेष सभा बोलविली होती. त्यासाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची नेमणूक करण्यात आली.
जाधववाडीतील बाजार समितीच्या हॉलमध्ये दुपारी २ वाजता भाजपाचे संचालक तसेच व्यापारी व हमाल-मापाडी संचालक व काँग्रेसचे ३ संचालक दाखल झाले. यानंतर उपविभागीय अधिकारी हदगल यांनी सभेचे सुत्रहाती घेतली. पराभव दिसत असल्याने सभापती संजय औताडे व काँग्रेसचे संचालक या सभेला आलेच नाही. औताडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. १३ संचालकांनी हात वरती करुन त्यास पाठींबा दिला. १३ विरुद्ध शून्य असा अविश्वास ठराव पास झाला.
काँग्रेसचे बाबासाहेब मुगदल, राधाकिसन पठाडे व शिवाजी वाघ यांनी भाजपला साथ दिली तसेच हमाल-मापाडी संचालक देवीदास किर्तीशाही यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपाच्या ठरावाला पाठींबा दिला. भाजपाचे ७ संचालक, २ व्यापारी संचालक व ३ काँग्रेसचे संचालक व १ हमालमापाडी असे १३ मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडली. अवघ्या १५ मिनीटात विशेष सभा संपली. यामुळे मागील दोन वर्षांपासून बाजार समितीवर असलेली काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. अविश्वास ठराव जिंकताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
सभापतीपदासाठी राधाकिसन पठाडे यांच्या नावाची चर्चासभापती संजय औताडे यांची साथ सोडून काँग्रेसमधून भाजपामध्ये उडी मारणारे संचालक राधाकिसन पठाडे यांच्या नावाची चर्चा सभापतीपदासाठी सुरु झाली आहे. कारण, काँग्रेसचे संचालक फोडण्यात यांचा मोठा वाटा होता व सभापतीपद मिळाले तरच अविश्वास ठरावाला पाठींबा देईल, अशी अटच त्यांनी घातली होती, अशी चर्चा दिवसभर बाजार समितीमध्ये सुरु होती. याशिवाय बाबासाहेब मुगदल, दामोधर नवपुते याच्याही नावाची चर्चा होती.