लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्रासह देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ६० वर्षांत केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’ काढली आहे. या यात्रेची सुरुवात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करून रविवारी (दि.८) झाल्याची माहिती आयोजक राजेश मुंडे यांनी दिली.देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँगे्रस पक्षाने विकास केलाच नसल्याचा आरोप भाजपचे नेते सतत करतात. या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या युवकांनी एकत्र येऊन कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’चे आयोजन केले आहे. या यात्रेत ज्याठिकाणी भेट देण्यात येईल, त्याठिकाणच्या काँग्रेस पक्षाच्या दिवंगत नेत्याला अभिवादन करून त्यांच्या स्मृतिस्थळावरील मूठभर माती घेण्यात येणार आहे. या अभिनव मोहिमेची सुरुवात महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळापासून करण्यात आली.या मोहिमेत कराड, वारणा, इस्लामपूर, सांगली, अकलूज, लातूर, नांदेड, गंगाखेड, वसमत, हिंगोली, पुसद, यवतमाळ, पवनार येथील गांधी आश्रम, नागपूर, काटोल, अकोला, बुलडाणा, सोयगाव, औरंगाबाद, वैजापूर, लोणी, संगमनेर, पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, ग्वाल्हेर, दौसा येथून दिल्लीतील महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाट येथे यात्रेचा समारोप २२ जुलै रोजी केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत होणारआहे.या यात्रेत निवडलेल्या ठिकाणी समृद्ध नेतृत्वाने केलेल्या कार्याला, कर्तृत्वाला उजाळा दिला जाणार आहे. यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, जवाहरलाल दर्डा, राजारामबापू पाटील, बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव मोहिते पाटील, भाऊसाहेब थोरात, तात्यासाहेब कोरे, डॉ. रफिक झकेरिया यांच्यासह इतर नेतृत्वांनी महाराष्ट्रासह देश सक्षम केल्याची जाणीव करून देण्यात येणार असल्याचेही राजेश मुंढे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसची कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:18 AM