औरंगाबाद : जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना-भाजप युतीमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या नावाने चर्चा होत असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससहवंचित बहुजन आघाडीने मतदारसंघ बांधणी वेगाने सुरू केली आहे. युतीला टक्कर देण्यासाठी संभाव्य उमदेवारांनी मतदारांशी लोकसभा निवडणुकीपासूनच संपर्क सुरू केलेला आहे. त्यामुळे युतीला एकतर्फी विजय मिळविणे अवघड होणार आहे.
जिल्ह्यात वैजापूरवगळता एकही मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेसच्या आघाडीकडे नाही. त्यामुळे आघाडीने जिल्ह्यात इच्छुकांच्या मुलाखती घेऊन तुल्यबळ उमेदवारांचा शोध घेतला आहे. वैजापूरचे आ. भाऊसाहेब चिकटगावकर हे इतर पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या होत्या; परंतु सध्या तरी तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे चित्र आहे. पैठणमधून राष्ट्रवादीने तयारी पूर्ण केली आहे. फुलंब्रीत माजी आ. कल्याण काळे यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. माजी आ. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तेथे काँग्रेसमधील दुसरी फळी लोकसभा निवडणुकीपासूनच कामाला लागली आहे. पालोदकर यांनी मतदारसंघाकडे ताकदीने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कन्नडमधून माजी आ. नामदेव पवार यांनीही काँग्रेसकडून मतदारसंघाचा पूर्ण आढावा घेतला आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील उमेदवारीबाबत अजून काही निर्णय झाला नसला तरी ऐनवेळी युतीतून नाराज झालेला तगडा उमेदवार आघाडीकडून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम मतदारसंघातही काँग्रेसने संपर्क सुरू ठेवला आहे. मध्य आणि पूर्व मतदारसंघात काँगे्रसचे अजून काहीही ठरलेले नाही. युतीचा सर्वत्र बोलबाला असला तरी वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनेही मोठ्या ताकदीने जिल्हा पोखरला आहे.
या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्याप पत्ते ओपन केलेले नाहीत. मनसेचे येथील संघटन कोलमडल्यामुळे पक्षाकडून उमेदवार देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मनसेने जर वंचित किंवा आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे उमेदवार कदाचित विधानसभेच्या मैदानात नसतील, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.
वंचित आघाडीही सरसावली
शहरातील तिन्ही मतदारसंघांपैकी पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने कामाला सुरुवात केलेली आहे. २०१४ च्या पराभूत उमेदवारांपैकी पूर्व मतदारसंघात एकाने संपर्क अभियान वेगाने सुरू केले आहे. पश्चिम मतदारसंघात वंचितचा उमेदवार जवळपास निश्चितच आहे. मध्यमधून खा. इम्तियाज जलील ठरवतील तो उमेदवार समोर येईल. एमआयएम व भारिप यांच्यातील जागावाटपानंतरच सर्व काही निश्चित होणार असले तरी सध्या उमेदवारांना संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद, फुलंब्री या मतदारसंघातूनही वंचित आघाडीने उमेदवार हेरले आहेत. ऐनवेळच्या राजकीय उलथा-पालथीमध्ये फुलंब्रीतून ओबीसी चेहरा वंचितमधून पुढे आला तर नवल वाटू नये.