काँग्रेसला घरघर; निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या नेत्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाजपत
By विकास राऊत | Published: August 4, 2022 07:38 PM2022-08-04T19:38:32+5:302022-08-04T19:38:56+5:30
येत्या निवडणुकीत भाजप मागील उणीव भरून काढत जि.प. ताब्यात घेईल; आमदार बागडे यांचा विश्वास
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला घरघर लागली आहे. फुलंब्री मतदारसंघातील करमाड गटातून निवडून येत ईश्वर चिठ्ठीच्या आधारे जि.प.अध्यक्ष झालेल्या मीना शेळके व त्यांचे पती काँग्रेस तालुका अध्यक्ष रामूकाका शेळके यांनी गुरुवारी आ.हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात हा प्रवेशाचा सोपस्कार पार पडला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांना हा मोठा धक्का मानला जात असून काँग्रेसमधील सासुरवासाला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे शेळके दाम्पत्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेसमध्ये असलेले दोन गट, चुकीचे आरोप करणे, आम्हाला वारंवार डावलणे यासारखे प्रकार मनाला पटले नाहीत. कुठलीही अट न ठेवता भाजपत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
आ.बागडे म्हणाले, गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपचे २३ जि.प.सदस्य होते. अध्यक्षपदापर्यंत जाण्याची भाजपची तयारी होती. परंतु काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे अध्यक्षपद मिळाले नाही. येत्या निवडणुकीत भाजप मागील उणीव भरून काढत जि.प. ताब्यात घेईल.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, माजी जि.प.सभापती अनुराधा चव्हाण, तालुका अध्यक्ष श्रीराम शेळके, कृउबा माजी सभापती राधाकिसन पठाडे, दामोदर नवपुते, राजू शिंदे, दत्ताभाऊ उकर्डे, सजनराव मते, प्रकाश काकडे, अशोक साळुंके, अशोक पवार, पं. स. माजी सभापती सरसाबाई वाघ, सजन बागल आदींची उपस्थिती होती.
इतर नेत्यांना काही माहिती नाही
भाजपाच्या इतर नेत्यांना या प्रवेशाबाबत काहीही माहिती नव्हते. प्रदेश सरचिटणीस आ.अतुल सावे यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांना देखील असा काही प्रवेश होणार असल्याची साधी माहिती देखील देण्यात आली नव्हती. केणेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी मुंबईत आहे, मला याबाबत काही माहिती नाही.