औरंगाबादः काँग्रेस दलाली करणारी पार्टी आहे. त्यांनी देशाचे संरक्षण विकले असून अगस्टा वेस्टलँड खरेदीतील घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून ते राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचा कांगावा करत असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केला. ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हॅशले आणि क्रिश्चन मिशेल या मध्यस्थांकडे २००९ मध्ये अगस्टा वेस्टलॅण्डच्या खरेदी व्यवहार कराराचे कागदपत्रे सापडले आहेत.२००८ मध्ये मिशेलने पत्र लिहून अगस्टा वेस्टलॅण्डचा सौदा अंतीम होत असून इटालियन स्त्रीचा मुलगा पंतप्रधान होईल व तो सौद्याचा व्यवहार पूर्ण करण्याचे म्हटले होते. २०१३ साली हा करार रद्द होण्यापूर्वी अगस्ट वेस्टलॅण्डची तीन हेलीकॅप्टर युपीए सरकारने खरेदी केली होती. यासोबतच अगस्टा वेस्टलॅण्ड खरेदीत ५२ टक्के काँग्रेस, २७ एअरफोर्स, उर्वरित टक्केवारी संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांची असेल, असे त्यावेळी ठरल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.