काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांचा औरंगाबादशी संपर्कच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:13 PM2020-03-21T12:13:03+5:302020-03-21T12:17:00+5:30
संघटनात्मक बांधणीसाठी पावले उचलण्याची गरज
- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद : काँग्रेसचेऔरंगाबादचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यापासून औरंगाबादला दर्शनच झाले नाही, संपर्क तर दूरच. याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. औरंगाबाद मनपा निवडणुकीनिमित्त का होईना ते येतील, असे वाटले होते; पण आलेच नाहीत. सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे, काय होते नि काय नाही, अशी भीती असतानाही ‘काळजी घ्या’, असे ते शहरात येऊन सांगतील, असे वाटले होते; पण तसेही घडताना दिसत नाही.
त्या त्या जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्री नेमून पक्ष संघटना वाढविण्यास मदत करणे, सरकारच्या योजनांचा प्रचार-प्रसार करणे, त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांशी, जनता-जनार्दनाशी संपर्क वाढविणे हा संपर्कमंत्र्यांच्या नियुक्तीमागचा उद्देश; पण तो कुठेही साध्य होताना दिसत नाही, हे औरंगाबादच्या संपर्कमंत्र्यांच्या निष्क्रियतेवरून लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
आधीच काँग्रेसची स्थिती खराब
आधीच औरंगाबादच्या काँग्रेसची स्थिती खराब आहे. मनपा निवडणुकीसाठी जेमतेम इच्छुकांचा काँग्रेसकडे ओढा दिसला. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यापासून जिल्हा काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. तो कधी नेमला जाणार, याची शाश्वती नाही. शहराध्यक्षांबद्दल मुस्लिम-दलित समाजात प्रचंड नाराजी आहे.
शहराचा अध्यक्ष मुस्लिम चेहरा असावा, असा जोर वाढूनही विद्यमान पक्षनेतृत्व त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसत आहे. मध्यंतरी बदल घडणार असे चित्र असताना प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. कार्यकर्त्यांच्या भावनाही कोणी जाणून घेण्यास तयार नाही. संपर्कमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची गरज असते; पण औरंगाबादच्या संपर्कमंत्र्यांना एकदाही औरंगाबादला यायला वेळ मिळला नाही, याबद्दल नाराजी तर व्यक्त होतच आहे; पण कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. विलासराव देशमुखांचे
औरंगाबादवर विशेष प्रेम...
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे औरंगाबादवर विशेष प्रेम होते. औरंगाबादसाठी काही करण्याची त्यांची ऊर्मी होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये पैठणगेटसारख्या मध्यवर्ती ठिकाणी गोविंदभार्इंचा पुतळा उभा राहिला. कारण यासाठी स्वत: विलासरावांनी पुढाकार घेतला. शिवाय काही संस्था उभारणीमध्ये त्यांचा वाटा आहे.
अमित देशमुख यांना विलासराव देशमुख यांचा वारसा लाभलेला आहे आणि योगायोगाने त्यांच्याकडे औरंगाबादचे संपर्कमंत्री पद लाभलेले आहे. खरेतर या संधीचे सोने व्हायला हवे असे काँग़्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटत आहे, पण तसे चित्र सध्या तरी दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
नाही तर तात्काळ संपर्कमंत्री बदला...
अमित देशमुख यांना वेळच नसेल, ते वारंवार औरंगाबादला येऊ शकत नसतील तर त्यांना बदलणे हाच यावरचा योग्य उपाय दिसतो. त्यापेक्षा किती तरी वेळा अशोक चव्हाण औरंगाबादला येऊन जात असतात. त्यांचे औरंगाबादशी असलेले नाते जुनेच आहे. त्यांचे घराणे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे.४ जायकवाडी जलाशयाचे शिल्पकार असलेले शंकरराव चव्हाण यांना मराठवाड्यातील जनता कधीच विसरू शकत नाही. त्यांचे चिरंजीव अशोकराव चव्हाण हे औरंगाबादच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी लीलया पेलू शकतात व त्यांचा इथल्या काँग्रेसला काही फायदाही होऊ शकतो. सध्या तर कोरोनाचा हैदोस चालू आहे. तीन महिन्यांपुरती मनपा निवडणूक पुढे ढकलली गेली आहे, त्याआधी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पावले उचलण्याची गरज आहे, हे सर्वांनाच पटते; पण प्रत्यक्षात काय होईल, हे कुणीही सांगू शकत नाही.