कॉग्रेसने १२ जागा द्याव्यात- बाळासाहेब आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:36 AM2018-07-10T01:36:15+5:302018-07-10T01:36:38+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसशी आघाडी करण्यास इच्छुक आहे. महाराष्टÑातील लोकसभेच्या ४८ पैकी किमान १२ जागा वंचित बहुजन आघाडीला मिळायला हव्यात. उर्वरित जागा काँग्रेसने लढवाव्यात, असा आमचा काँग्रेसकडे खुला प्रस्ताव असल्याचे आज येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसशी आघाडी करण्यास इच्छुक आहे. महाराष्टÑातील लोकसभेच्या ४८ पैकी किमान १२ जागा वंचित बहुजन आघाडीला मिळायला हव्यात. उर्वरित जागा काँग्रेसने लढवाव्यात, असा आमचा काँग्रेसकडे खुला प्रस्ताव असल्याचे आज येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले.
मौलाना आझाद संशोधन केंद्रात या आघाडीच्या वतीने ओबीसी- भटक्या- विमुक्तांशी संवाद साधल्यानंतर ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत होते.
एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत आमचे भाजप- सेनेला समर्थन राहणार नाही. विचारांशी तडजोड करून या पक्षाबरोबर जे गेले ते कैलासवासी झाले. ‘त्या’ कैलासवासी झालेल्यांशीही आमचा काही संबंध नाही. केंद्रातील जातीयवादी सरकार या देशातील तमाम वंचितांना सोबत घेऊन खाली खेचणे आणि वंचितांच्या हातात सत्तेची सूत्रे देणे हा आमचा हेतू आहे. राष्टÑवादी काँग्रेस किंवा शरद पवार यांच्याबरोबर आमची आघाडी शक्य नाही. काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी बारामतीची जागाही लढवील. तेथे उपराकार लक्ष्मण किंवा विजय मोरे यांच्यापैकी कुणीही लढेल.
नरेंद्र मोदी उंदीर... त्यांना मारण्यासाठी बंदूक कशाला हवी?
पुण्याच्या एल्गार परिषदेनंतर आता माओवादी आणि नक्षलवादी म्हणून कार्यकर्त्यांची अटक सुरू आहे. त्यात तुमचंही नाव येतंय. नरेंद्र मोदींना मारण्याचा कट शिजवल्याचा आरोप होतोय, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच अॅड. बाळासाहेब आंबेडकर उसळून म्हणाले, नरेंद्र मोदी तर एक उंदीर होय. त्यांना मारण्यासाठी कट शिजवण्याची आणि बंदूक वापरण्याची गरज काय? उंदीर तर टिक व्टेंटीनं मरतं.