छत्रपती संभाजीनगर : वाढती महागाई, बेरोजगारीच्या विरोधात युवक काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी सिडको बसस्थानक चौकात रविवारी दुपारी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी गळ्यात टमाटे, मिरची, कोथिंबीर, भेडीच्या माळा घालून कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी काही काळ वाहतूक खोळंबली होती.
दरम्यान, पोलिसांनी रस्ता अडवून धरलेल्या कार्यकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. पण, कार्यकर्ते पोलिसांनाही जुमानत नव्हते. अखेर सिडको ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे पुढे सरसावले. त्यांच्या सूचनेनुसार पोलिस कर्मचाऱ्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ, डॉ. नीलेश अंबेवाडीकर, डॉ. अरुण शिरसाठ, सागर नागरे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून अटक केली. ठाण्यात नेऊन काही वेळाने त्यांची सुटका केली.
वाढत्या बेरोजगारी व महागाईने कळस गाठला आहे. भाजप सरकारला गोरगरिबांचे काहीही देणेघेणे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशी दौऱ्यात, तर राज्यातील भाजपचे नेते विरोधी सरकार पाडणे आणि सत्ता स्थापन करण्यातच व्यस्त आहेत. या शब्दात डॉ. काळे व शेख युसूफ यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांचा निषेध केला. यावेळी भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजीने सिडको बसस्थानक चौक दणाणून सोडला.
या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जफर खान, गटनेता भाऊसाहेब जगताप, महिला शहर अध्यक्षा दीपाली मिसाळ, ॲड. सय्यद आक्रम, अनीस पटेल, डॉ. पवन डोंगरे, डॉ. सरताज पठाण, मुदतस्सीर अन्सारी, कृष्णा भंडारी, आमेर अब्दुल सलीम, इरफान पठाण, इद्रीस नवाब, आसमत खान, साहेबराव बनकर, शेख रईस, रेखा राऊत, अनिता भंडारी, नंदा घोरपडे, सविता म्हस्के, सिंधू पवार, मंजू लोखंडे, विजय कांबळे, सुमेध नन्न्नावरे, प्रा. शीलवंत गोपीनारायण, लियाकत पठाण आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.