खुलताबाद : राज्यात महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी विकासकामे केली आहेत. त्या जोरावर राज्यात कांग्रेसला पुन्हा उभारी देवून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल पाहावयास मिळेल, असा विश्वास सांस्कृतिक व वैद्यकिय शिक्षण तथा कॉंग्रेसचे औरंगाबादचे संपर्क मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला. ते खुलताबाद येथे नुतन सरपंच-उपसरपंचाच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
खुलताबाद तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने अनेक गावात सत्ता काबीज केली आहे. नुतन सरपंच , उपसरपंचांचा सत्कार मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आगामी सर्व निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल. यातूनच औरंगाबाद महापालिका निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. औरंगाबाद जिल्ह्यात एकमेव खुलताबाद नगरपरिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. आज खुलताबादला पक्ष जिवंत आहे. इथे काहीही कमी पडू देणार नाही. खुलताबाद शहराच्या पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील मंत्री देशमुख यांनी दिले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागातर्फे मराठवाड्याचे ' सांस्कृतिक सर्किट ' तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ .कल्याण काळे, माजी आ. सुभाष झांबड, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, नगराध्यक्ष अँड. एस . एम . कमर, विलास औताडे, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे, जगन्नाथ खोसरे, मजहर पटेल, आबेद जहागीरदार, शहराध्यक्ष अब्दूल समद टेलर यावेळी उपस्थित होते. किरण पाटील डोणगावकर यांनी प्रास्तविक केले . तर आभार तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे यांनी व्यक्त केले.