औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिन्सी येथील भूखंड विक्री व्यवहारावरून (Jinsi Land Case)चौकशी करण्याच्या महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांच्या आदेशास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांनी स्थगिती दिली आहे. यावरून जिल्ह्यात राजकीय संघर्ष ( Shiv Sena Vs Congress ) पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी लावलेल्या चौकशीस काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने आगामी काळात शिवसेना व काँग्रेसमधील संघर्ष बघावयास मिळणार आहे. कृउबाच्या मालकीची जिन्सी येथील गट क्रमांक ९२३३ येथील १५९४५ चौरस मीटर जमीन कृउबाने नियम पायदळी तुडवून विकली केल्याची व यात घोटाळा झाला असल्याची तक्रार डॉ. दिलावर मिर्झा बेग यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली होती. अशीच तक्रार जयमलसिंग रंधवा व पुंडलिकअप्पा अंभोरे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. सत्तार यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून चौकशी सुरूही झाली होती. अहवालाची प्रतीक्षा सुरू होती.
पुनर्विलोकन अर्ज...सत्तार यांच्या चौकशीच्या आदेशाविरुद्ध बाजार समितीच्या वतीने सचिव विजय शिरसाठ यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अर्धन्यायिक न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. पणन संचालकांच्या मान्यतेने हा व्यवहार झाला असून, सहकारमंत्र्यांच्या कडे यापूर्वीच चौकशी सुरू असल्याची बाब दुर्लक्षित करून सत्तारांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत. वेगवेगळ्या न्यायालयात एकाच प्रकरणाची समांतर चौकशी होणे योग्य नसून, त्यामुळे बाजार समितीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असा युक्तिवाद थोरात यांच्याकडे करण्यात आला. तो ग्राह्य धरून अंतिम निर्णयापर्यंत राज्यमंत्र्यांच्या आदेशास स्थगिती देण्याचे आदेश थोरात यांनी दिले आहेत.
वाद अधिक तीव्र होणारबाळासाहेब थोरात हे मागे पालकमंत्री असताना आणि सत्तार काँग्रेसचे आमदार असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दोघांमध्ये वाद झाले होते. आता थोरात महसूल खात्याचे मंत्री आहेत आणि सत्तार राज्यमंत्री थोरात यांच्या स्थगिती आदेशामुळे सत्तार दुखावले जाणार आणि त्यांच्यातला वाद अधिक तीव्र होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.