औरंगाबाद : येत्या २४ सप्टेंबरपासून काँग्रेसची एल्गार यात्रा सुरू होत आहे. सुभेदारी गेस्ट हाऊसजवळील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यास दुपारी २ वाजता अभिवादन करून या यात्रेचा प्रारंभ होईल. ही यात्रा सरकारची पोलखोल करीत व जनतेचे प्रश्न मांडत जिल्ह्यातील प्रत्येक सर्कलमध्ये व वॉर्डावॉर्डात जाईल, अशी माहिती आज येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रपरिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, येणाऱ्या निवडणुकांची ही तयारीच असून, नंतर ही यात्रा प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा औरंगाबादला आल्यानंतर त्यात विलीन होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीमुळे बसलेला फटका, पेट्रोल- डिझेलची रोजच होणारी दरवाढ, अयशस्वी झालेली कर्जमाफी, दिलेल्या आश्वासनांची न केलेली परिपूर्ती, असे असंख्य मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी मूळ प्रश्न बाजूला ठेवून मतांसाठी सातत्याने कसे सामाजिक व धार्मिक तेढ वाढवली, याचीही आम्ही पोल खोलू. या यात्रेचा मुक्काम त्या- त्या गावच्या शाळा परिसरात किंवा मंदिरात राहील. यानिमित्ताने आम्ही काँग्रेसमधील मरगळ दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यातून बुथ कमिट्यांचे गठनही करू. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील, डॉ. पवन डोंगरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
ही मॅच फॅक्सिंग हैदराबादेत झालीओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची मॅच फिक्सिंग हैदराबादेत झाली. त्याचा पर्दाफाशही मी या यात्रेत करणार आहे. काँग्रेस महाआघाडीसाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सक्रिय झाले आहेत. सध्या बैठकांवर बैठका चालू आहेत. एमआयएम व मनसे या जातीयवादी पक्षांशी आघाडी करायचीच नाही, असा निर्णय झालेला आहे. पण प्रकाश आंबेडकर यांना बहुजन वंचित आघाडीचा उद्देशच समजलेला नाही. काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. प्रकाश आंबेडकर यांची अचानक एमआयएमशी आघाडी झाली. त्याचा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही. एमआयएम कुणासाठी काम करते हे सर्वांना माहीत आहे. त्यात आता भारिप-बहुजन महासंघाची भर पडली म्हणावी लागेल, असे आ. सत्तार म्हणाले.