सिल्लोड (औरंगाबाद ) : सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी २१ पैकी ०९ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यातील चौघांची प्रकृती जास्त प्रमाणात खालावली असून एका उपोषणकर्त्याला सिल्लोड येथील रुग्णालयात अतिवदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.
सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करावे, अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. सोळा दिवसा पासून चक्री उपोषण केल्यावर प्रशासनाने याची दखल न घेतल्याने बुधवार पासून २१ उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
यातील निजाम पठाण या उपोषणकर्त्याचा अचानक रक्तदाब वाढल्याने त्यांना सिल्लोड येथील रुग्णालयात अतिवदक्षता विभागात पाठवावे लागले. इतर उपोषणकर्त्यांना वैद्यकीय पथकाने उपचार घेण्याचा सल्ला दिला परंतु त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास सपशेल नकार दिला.