औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्ली, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केल्यानंतर स्पाईस जेटने सोमवारी (दि.२५) बंगळुरू-औरंगाबाद-बंगळुरू विमान सुरू करून शहराच्या कनेक्टिव्हिटीत भर टाकली.
बंगळुरूहून ७१ प्रवाशांना घेऊन स्पाईस जेटचे विमान औरंगाबादेत दाखल झाले. यावेळी विमानतळ प्राधिकरणातर्फे वैमानिकांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, औरंगाबाद क्लॉथ मर्चंटचे अध्यक्ष विनोद लोया, डॉ. विनोद तोतला, डॉ. शिल्पा तोतला, आनंद अग्रवाल, स्पाईस जेटचे स्टेशन मॅनेजर आर. एच. मुजावर, मनोज गुप्ता आदींसह विमानतळावरील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. दुपारी १२.२० वाजता या विमानाने बंगळुरूसाठी उड्डाण घेतले. औरंगाबादहून ४० प्रवासी रवाना झाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी दिली.
हैदराबादपाठोपाठ आता बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराची दक्षिण भारताबरोबरची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली आहे. दक्षिण भारतातून धार्मिक आणि पर्यटनस्थळांना भेट देणाºयांची मोठी संख्या आहे. या विमानसेवेच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्पाईस जेटने ९० आसन क्षमतेच्या बम्बार्डियर विमानाद्वारे ही सेवा सुरू केली आहे. उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, बंगळुरू साठी सुरू केलेल्या विमानाला प्रवाशांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. या विमानसेवेची अनेक दिवसांपासून मागणी होत होती. त्यासाठी पाठपुरावा केला आणि अखेर ही सेवा सुरू झाली. दिल्लीसाठीही आणखी एक विमान सुरू केले. मुंबईसाठी विमान सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. शिर्डी विमानतळावरील विमाने सध्या औरंगाबादहून उड्डाण घेत आहेत. या सगळ्यात पहिल्याच दिवशी ४० प्रवासी बंगळुरूला रवाना झाले.
दीडशे प्रवासी दिल्लीला रवाना८ आॅक्टोबर रोजी स्पाईस जेटच्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेला सुरुवात केली. अवघ्या काही दिवसांतच या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मार्गावर मोठे विमान सुरू केले. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या कंपनीने बंगळुरूबरोबर सोमवारी दिल्लीसाठी आणखी एक विमान सुरू केले. या विमानाने पहिल्याच दिवशी जवळपास शंभर प्रवासी औरंगाबादेत आले आणि दीडशे प्रवासी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती विमानतळाच्या अधिका-यांनी दिली.
मुंबई विमानाकडे लक्षऔरंगाबादहून मुंबईसाठी नवीन विमान सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केला जात आहे. ‘इंडिगो’च्या माध्यमातून ही विमानसेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.