जालना येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मेंदूत अचानक रक्तस्राव झाल्याने त्या कोमात गेल्या होत्या. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डाॅक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले होते. यावेळी नातेवाइकांना अवयव दानाविषयी माहिती देण्यात आली. गरजू रुग्णांना जीवदान मिळेल या भावनेने नातेवाइकांनी तत्काळ अवयवदानाला होकार भरला. त्याविषयी झोनल ट्रान्सप्लांट को ऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) ला माहिती देण्यात आली. रविवारी दिवसभर अवयवदानाच्या विविध मान्यतेच्या प्रक्रिया पार पाडल्या गेल्या. दरम्यान, चेन्नई, मुंबई, दिल्ली येथे लिव्हर, किडनी देण्यासंबंधीची पडताळणी केली गेली.
या अवयवदानामुळे कोरोनाकाळात पहिलेच अवयवदान होईल, अशी आशा वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत होती. मात्र, अवयवदानापूर्वी काही वेळ आधीच महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे अवयवदान टळले. लिव्हर, किडनीसह इतर अवयव दान होणार होते. त्याविषयी सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, ते शक्य होऊ शकले नाही, अशी माहिती डाॅ. शरद बिरादार आणि झेडटीसीसीचे समन्वयक मनोज गाडेकर यांनी दिली.