औरंगाबाद : शहागंज येथील ऐतिहासिक क्लॉक टाॅवरची दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम येत्या १० दिवसांत सुरू होणार आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) शहागंज येथील घड्याळ टॉवरचा जीर्णोद्धार व संवर्धनासाठी ठेकेदाराला कामाचे पत्र दिले आहे.
१९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ निजाम शैलीतील वास्तूंचा मेळ घालणारी आहे. यासंदर्भात मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय म्हणाले की, जुन्या शहराची ओळख क्लॉक टॉवरमुळे आहे. टॉवरचे संवर्धन केल्यास जुन्या शहराचे हरवलेले वैभव परत मिळण्यास मदत होईल. ऐतिहासिक दरवाजांचे संरक्षण व सुशोभिकरण करण्याचे काम संपल्यानंतर शहागंज येथील टॉवर सुशोभित करण्याचे काम हाती घेतले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत असे आणखी काही प्रकल्प हाती घेण्यात येतील.
------
चार महिन्यांत पूर्ण होणार काम
घड्याळ दुरुस्ती आणि सुशोभिकरण प्रकल्पाची अंदाजे किंमत २९.११ लाख रुपये असून कामाचे आदेश दिल्यानंतर ४ महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. कंत्राटदाराने बँकेची हमी दिल्यावर दहा दिवसांत काम सुरू होणार असल्याचे एएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांनी सांगितले.
उगवलेले गवत काढून टाकणे, जीर्णोद्धार तसेच पृष्ठभागावरील कलात्मक घटकांची रचना तसेच मजबुतीकरण करणे, विटांच्या पृष्ठभागास मूळ सामग्रीसह पुनर्स्थित करणे, विघटित आणि मोडलेली सामग्री पुनर्स्थित करणे आदींचा या कामांत समावेश असल्याचे एएससीडीसीएलच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले.