औरंगाबाद : शहरात मेसिकॉन संयोजन समिती, औरंगाबाद सर्जिकल सोसायटी आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय परिसरात मेसिकॉन-२०१९ ही शस्त्रक्रिया तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेत प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानावर विचारमंथन होणार आहे.
यावेळी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. राजेंद्र शिंदे, संयोजन अध्यक्ष डॉ. मिलिंद देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर मुसांडे, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख, डॉ. नारायण सानप आदी उपस्थित होते. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ३१ जानेवारीला शस्त्रक्रियासंदर्भात मूलभूत बाबींवर चर्चा, प्रात्यक्षिक होईल. १ फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक होणार आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत होतील.
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या हस्ते शस्त्रक्रियांच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेचे उद्घाटन होईल. त्यानंतर निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण सत्राचे उद््घाटन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते तर मुख्य परिषदेचे उद्घाटन एमजीएम आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू कमलकिशोर कदम यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता होईल. परिषदेत दक्षिण कोरियाचे डॉ. जी. चोई यांच्यासह देशभरातील तज्ज्ञांची उपस्थिती राहणार आहे. परिषदेसाठी अमेरिकेहून दाविंची रोबो येत असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
तज्ज्ञांना भेटापरिषदेत १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता एमजीएम द्योतन सभागृहात आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता या समस्यांवर ‘तज्ज्ञांना भेटा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये या समस्यांवर डॉक्टर नागरिकांशी संवाद साधतील. ३ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता गेट गोइंग मॅरेथॉन होणार आहे.