औरंगाबाद : खोेटेनाटे आरोप होत आहेत. पण, त्यातून निघत काहीच नाही. लोकशाहीत विरोध जरूर करा. गेल्या पन्नास वर्षात पवार कुटुंबावर जेवढे आरोप झाले तेवढे कोणावरच झाले नसतील. आम्ही काय सोसलंय, ते आमच्या आम्हालाच माहीत. ईडी, सीबीआय यांसारख्या एजन्सीजचा गैरवापर सातत्याने वाढतोय, असा आज आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
सायंकाळी मराठी पत्रकार भवनात त्या पत्रकारांशी वार्तालाप करीत होत्या. याच वेळी शरद पवार यांच्याकडून उपलब्ध झालेल्या पाच लाखाच्या निधीतून करण्यात आलेल्या नूतनीकरणाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सतीश चव्हाण व नीलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
अनिल देशमुख यांचेच उदाहरण घ्या. सात सात वेळा त्यांच्यावर रेड पडते. काय चालू आहे हे. कोणत्या क्षमतेतून तुम्ही या कारखान्यात छापा मारताे, त्या कारखान्यात घुसतो, असे म्हणताय. मुलगा एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाला तर रिचेकिंगसाठी अर्ज करायचा असतो. प्रिन्सिपॉलच्या घरात घुसायचे नसते, असा टोला नाव न घेता किरीट सोमय्या यांना सुळे यांनी लगावला.
मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, या प्रश्नावर त्या उत्तरल्या, गेल्या १५ वर्षांपासून या प्रश्नाची चर्चा होतेय. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री पुरुष व्हावा की महिला. यापेक्षा तो कर्तृत्वान असावा, राज्याचे हित जपणारा असावा हेच महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादेतील वक्तव्याकडे आपण कसे बघता, यासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार, जयंत पाटील आदींनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर पुन्हा मी काही वेगळी प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही.
काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारांसाखी झाली आहे, या शरद पवार यांच्या वक्तव्यावर त्या म्हणाल्या, ते माझे नेते आहेत. पवारसाहेबांची ती मुलाखत दीड तासांची होती. त्यात ते काँग्रेसबद्दल बरेच चांगलेही बोलले आहेत.
नूतनीकरणाच्या निमित्ताने केलेल्या भाषणातही सुळे यांनी पत्रकारांनी उद्देशून हितोपदेश केला. राजकारणी आणि पत्रकार यांचे एक नाते असते. ते जपले पाहिजे. शिवाय दोन्ही बाजूंनी उथळपणा नको. अति घाई, जीवघेणी स्पर्धा यात बातमी हरवतेय, भाषाही हरवतेय. मराठी भाषेचे जतन करा, ती अधिकाधिक समृद्ध करा, असे त्या म्हणाल्या. निरंजन भालेराव यांच्या बासरीवरील गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद काकडे यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस विकास राऊत यांनी आभार मानले.