पैठण : जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. ७०० क्युसेक क्षमतेने डाव्या कालव्यातून विसर्ग करण्यात येत आहे.
मराडवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत सोमवारी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जायकवाडीच्या डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील १२०००० हे. सिंचन क्षेत्रासाठी १७० दलघमी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली असून पहिले आवर्तन २० ते २२ दिवस सुरू राहणार आहे. डाव्या कालव्या प्रमाणे जायकवाडीच्या उजव्या कालव्यावरील लाभक्षेत्रासाठी मागणी आल्यास पाणी सोडण्यास मान्यता मिळाली असल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. सध्या रब्बी हंगामातील गहू , बाजरी , तूर , हरभरा या पिकांसाठी पाणी लाभदायक ठरणार असल्याने जायकवाडी लाभक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे.
धरणातील पाणी ३१ जुलै २०२१ पर्यंत पुरेल असे नियोजन....या वर्षी खरीप हंगामा अखेर दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजीपर्यंत धरणात १००% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले असल्याचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
रब्बी हंगामात तीन तर उन्हाळ्यात पाच आवर्तने......धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातून रब्बी हंगामात तिन तर उन्हाळी हंगामात पाच आवर्तने देणे प्रस्तावित असून जलाशयासह डावा आणि उजवा कालव्यावर १४६९०० हे. क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे. त्याकरिता अनुक्रमे ६१८ दलघमी व ५३० दलघमी असे एकूण ११४८ दलघमी पाणीवापर होईल असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.