पैठण : शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत मंगळवारी दुपारी जायकवाडी धरणातून चणकवाडी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडावे म्हणून शेतकऱ्यांचा गेल्या २५ दिवसा पासून कागदोपत्री पाठपुरावा प्रशासनाकडे सुरू होता. पाणी सुटल्याने चणकवाडी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज दुपारी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून १०४८ क्यूसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला. सध्या धरणात ६६.३८ टक्के जलसाठा शिल्लक असून धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातूनही शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरु आहे. मंगळवारी शेतकरी चंद्रकांत झारगड यांच्या उपस्थितीत उपअभियंता ज्ञानदेव शिरसाट, सहायक अभियंता संदिप राठोड, गणेश खराडकर, राजाराम गायकवाड, रामनाथ तांबे, शेषराव आडसूल, अब्दुल बारी गाजी यांनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पार पाडली. दरम्यान आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातही पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर या बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय होईल असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
जलविद्युत प्रकल्प सुरू असल्यास धरणाच्या खाली असलेल्या चणकवाडी बंधाऱ्यात विद्युत निर्मिती नंतर सुटलेले पाणी जमा होते. परंतु जायकवाडी प्रकल्पावरील जलविद्युत प्रकल्प गेल्या सहा महिण्यापासून बंद असल्याने गोदावरी पात्र व चणकवाडी बंधारा कोरडा पडला होता. परिसरातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना व शेती सिंचनासाठी बंधाऱ्यातून शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेल्या आहेत. यामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी चंद्रकांत झारगड व परिसरातील शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांनी शेतकऱ्यांची समस्या उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समोर मांडून पाणी सोडण्याचा निर्णय करून घेतला असे शेतकरी चंद्रकांत झारगड यांनी सांगितले.