पैठण : शासकीय रूग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह परिचारक ( ब्रदर ) च्या प्रथम संपर्कात आलेल्या रूग्णालयातील ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संपूर्ण पैठण शहराची धाकधूक वाढली होती. परंतु, आज अहवाल आल्यानंतर शहरवाशीयांचा जीव भांड्यात पडला.
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रामीण प्रशिक्षण पथक पैठण रूग्णालयातील एका परिचारकाचा कोरोना चाचणी अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान सदर बाधित ब्रदर पैठण येथील रूग्णालयातून दि १५ रोजी कर्तव्य बजावून औरंगाबाद येथे गेला होता, त्या नंतर मात्र तो परत रूग्णालय आला नव्हता. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने रूग्णालय प्रशासन व पैठण शहरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान गुरूवारी रूग्णालयातील ३९ अधिकारी, कर्मचारी व डॉक्टरांचे स्वँब घेउन ते विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज दुपारी या ३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अहवाल निगेटिव्ह येताच कालपासून रूग्णालय परिसरात व शहरात निर्माण झालेले तनावाचे वातावरण एकदम बदलले. दरम्यान नगर परिषदेच्या वतीने पैठण शासकीय रूग्णालय व नाथमंदिर परिसरातील भक्त निवासाचे आज पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात आले.
नागरिकांनी घाबरू नयेपैठण शहरातील रूग्णालयात सुरक्षेचे निकष पाळून कामकाज करण्यात येत आहे. रूग्णालयात येणारे ईतर रूग्ण व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेस प्रथम प्राधान्य आहे. रूग्णालयातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून नागरिकांनी काळजी घ्यावी व कोरोना महामारीच्या या लढ्यात आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन रूग्णालयाच्या प्रपाठक डॉ सीमा माळी यांनी आज केले.