औरंगाबाद : ‘मोठ्या मेहनतीने हा देश घडलाय. पं. जवाहरलाल नेहरू यांनी या देशाची घडी नीट बसवलीय. परंतु सध्या खोटे बोलण्याचे राजकारण सुरू आहे. केवळ तीन टक्क्यांसाठी हा देश हिंदुराष्ट्र बनविण्याचे षड्यंत्र रा. स्व. संघातर्फे रचण्यात येत आहे. मोदी- शहा रा. स्व. संघाचा अजेंडा राबवीत आहेत. परंतु भारतवासी हा अजेंडा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही’ असा हल्लाबोल आज येथे खा. हुसेन दलवाई यांनी केला.
मौलाना आझाद विचार मंचच्या तीनदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मौलाना आझाद संशोधन केंद्र, मजनूहिल येथे एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव ऊर्फ बाबूराव कदम यांच्या हस्ते सकाळी या शिबिराचे उद्घाटन झाले. विचारवंत जावेद अख्तर, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख हे या शिबिराला येऊ शकले नाहीत. मोदी- शहा जास्त मग्रुरी दाखवू नका, असा इशारा यावेळी दलवाईंनी दिला. मोदीजी, तुमची पात्रता काय? नेहरुंसमोर तुम्ही काहीच नाही. काही माणसं चुकून मोठी होतात. या देशातल्या जनतेनं तुम्हाला पंतप्रधान केलं आहे. तुम्हाला त्या पदावरुन हटवण्याचं कामदेखील जनतेचा करेल, असं दलवाई म्हणाले.एनआरसी, एनपीआरचा कोणताही अर्ज आम्ही भरणार नाही, असे बजावत दलवाई यांनी टीका केली की, आमच्या पूर्वजांनी कधीही ब्रिटिशांची दलाली केली नाही. हिटलरची स्तुती केली नाही. गोबेल्स नीतीचा वापर करणं, खोटे बोलणं, द्वेष करणं हे तुमचे काम. आमचं नाही. गोमांस खाल्लं म्हणून ठार मारण्याचा कुणाला अधिकार नाही. परंतु याच मुद्यावरून अखलाकला ठार मारण्यात आलं, असं दलवाई पुढे म्हणाले.
पहिल्यांदा मोदी-शहा यांनी आपलं नागरित्व सिद्ध करावं, असं आव्हान देत मुणगेकर यांनी या देशातल्या राजकीय पक्षांनी एनआरसी, सीएए व एनआरपीविरुद्ध असहकार पुकारावं, असं आवाहन केलं. उद्घाटक बाबूराव कदम यांनी गौतम बुद्धानं सांगितलेल्या धर्माच्या व्याख्येकडे उपस्थितांचं लक्ष वेधलं. पाप करू नये, पुण्यकर्म करावं व चित्त निर्मळ ठेवावं, असं बुद्धानं सांगितलं. आज धर्माच्या नावानं वादळं उठविली जात आहेत. ती निरर्थक आहेत, असं कदम यांनी नमूद केलं. संजय लाखे पाटील, युसूफ मुकाती, साथी सुभाष लोमटे, माजी खासदार उत्तमसिंग पवार यांची यावेळी भाषणे झाली. युसूफ अन्सारी यांनी सूत्रसंचालन केलं. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पटेल, नायब अन्सारी, मुकीम देशमुख, आबेदाआपा आदींची मंचावर उपस्थिती होती.
मोदी- शहा देशाला विनाशाकडे घेऊन जात आहेत या सत्रात माजी खासदार व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे मर्मग्राही भाषण झाले. मोदी- शहा आज जे काही करीत आहेत, त्यातून ते देशाला विनाशाकडे घेऊन जात आहेत, असे स्पष्ट मत मुणगेकर यांनी नोंदविले. ४त्यांनी सांगितले की, २०१४ पर्यंत या देशात उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता होती. त्यानंतर या देशात प्रतिक्रांती झाली. अच्छे दिन आयेंगे, दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार उपलब्ध करून देऊ, पंधरा लाख रु. तुमच्या खात्यावर जमा करूअशी खोटी आश्वासने दिली गेली. त्यातील एकही पूर्ण केले गेले नाही. मोदी- शहा देश मागे घेऊन जात आहेत. किंबहुना ते देशाला विनाशाकडे घेऊन जात आहेत.