औरंगाबाद: पोलीस ठाण्याला प्राप्त अर्जानुसार कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराला १ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड करीत ६० हजार रुपये घेतांना पोलीस हवालदार गणेश ज्ञानेश्वर अंतरप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही १ जुन रोजी सकाळी कारवाई एम आय डीसी वाळूज ठाण्याच्या प्रवेश दारावर झाली.
या कारवाईविषयी प्राप्त माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज परिसरातील एका कंपनीने तक्रारदार गांजा विक्री करतो, असा अर्ज दिला होता. मात्र त्यांनी यासबंधी अधिकृत तक्रार नोंदविण्यास नकार दिला होता. दरम्यान हा अर्ज हवालदार अंतरप यांच्याकडे होता. त्यांनी तक्रारदार यांस संपर्क करून त्याला कायदेशीर कारवाई करण्याची धमकी त्यांनी दिली. कायदेशीर कारवाई न करण्यासाठी दिड लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अंतरप विरूध्द तक्रार नोंदविली.
पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नंदकिशोर क्षीरसागर आणि कर्मचाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा आरोपी हवालदार अंतरप यांनी तडजोड करीत आज सकाळी ६० हजार रुपये पोलीस ठाण्यात आणून देण्यास सांगितले. आज सकाळी १० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी,कर्मचारी यांनी साध्या वेशात ठाण्याबाहेर सापळा रचला. १० वाजेच्या सुमारास हवालदार अंतरप यानी तक्रारदाराकडुन ६० हजार रुपये लाच घेताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस ठाण्याच्या गेटवर झाली. याप्रकरणी एम आय डी सी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.