औरंगाबाद: वाळू वाहतुक प्रकरणी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ट्रॅक्टरचालकास १२ हजार रुपये लाच मागून सहा हजाराचा पहिला हप्ता घेताना वैजापुर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश तुळशीराम पाटील(बक्कल नंबर ४२९) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई १५ जुलै रोजी वैजापुर येथील पोलीस वसाहतीच्या आवारात करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार यांच्या ट्रॅक्टरवर वाळू चोरीप्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक गणेश पाटील यांच्याकडे होता. तक्रारदार हे काही दिवसापूर्वी पोलीस नाईक पाटील यांना भेटले. त्यावेळी त्यांनी या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे १२ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी साध्या वेशात वैजापुर शहरातील पोलीस वसाहतीत सापळा रचला.
यावेळी तक्रारदार हे दोन पंचासमक्ष लाचेची रक्कम घेऊन पोलीस नाईक गणेश पाटीलला भेटले तेव्हा त्याने पुन्हा १२ हजार रुपये लाच मागून पहिला हप्ता म्हणून सहा हजार रुपये घेतले. यानंतर दबा धरून बसलेल्या लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी लाचेच्या रक्कमेसह गणेश पाटीलला पकडले. याविषयी गणेश पाटीलविरोधात वैजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश धोकरट, नंदकिशोर क्षीरसागर, कर्मचारी गणेश पंडुरे, विजय ब्राम्हंदे, सुनील पाटील, केवलसिंग घुसिंगे आणि चालक मिसाळ यांनी केली.