- विजय सरवदेऔरंगाबाद : भारतीय संविधान म्हणजे केवळ लिखित ग्रंथ नव्हे, तो आपली ऊर्जा व श्वास आहे. त्यामुळेच तर आज सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून जग आपल्याकडे पाहते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले मूळ संविधान कसे असेल, याविषयी उत्सुकता असलेल्या विद्यार्थी व जागरूक नागरिकांना मूळ संविधानाची प्रतिकृती शहरातील एम.पी. लॉ कॉलेज व जवाहर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात पाहता येईल.
याविषयी उपप्राचार्य डॉ. श्रीकिशन मोरे यांनी सांगितले की, भारतीय संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत स्वीकृत करण्यात आले व त्याच दिवशी सायंकाळी भारत सरकारने ते गॅझेटमध्ये प्रसिद्ध केले होते. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसूची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. बाबासाहेबांनी संविधान लिहून तयार केले होते, पण संविधान हे हस्तलिखित असावे, अशी नेहरूंची इच्छा होती. प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे त्यांनी अतिशय सुबकपणे संविधान हे कॅलिग्राफी शब्दशैलीच्या माध्यमातून लिहून काढले. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत शाई आणि ३०३ पेन वापरण्यात आले. ही प्रत तयार झाल्यावर संसद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी २४ जानेवारी १९५० रोजी अधिवेशन बोलाविण्यात आले. मूळ प्रतीवर २७३ संसद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून पृष्ठ क्रमांक २२३ वर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सही आहे. मूळ संविधानाची प्रत संसदेत अतिशय सुरक्षितपणे ठेवण्यात आली असून भारत सरकारने त्याच्या काही मोजक्याच प्रतिकृती छापल्या आहेत. त्यातील इंग्रजी व हिंदी भाषेतील दोन प्रतिकृती संसदेतून एम.पी. लॉ कॉलेजमध्ये आणल्या आहेत. दुसरीकडे, जवाहर कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातही अशाच प्रकारची संविधानाची इंग्रजी भाषेतील प्रतिकृती अतिशय सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक साहित्यिक व रिपब्लिकन नेत्यांनी या प्रतीचे अवलोकन केल्याचे या वाचनालयाचे अध्यक्ष काशिनाथ जाधव यांनी सांगितले.
संविधानाची प्रतिकृतीएम.पी. लॉ कॉलेजमध्ये असलेल्या इंग्रजी भाषेतील संविधानाच्या प्रतिकृतीचे वजन ८ किलो असून उंची ४२.५ सेंमी, रुंदी ३२ सेंमी आणि जाडी ५ सेंमी एवढी आहे, तर हिंदी प्रतिकृतीचे वजन ५ किलो असून उंची ४२.५ सेंमी, रुंदी ३२ सेंमी आणि जाडी ३.५ सेंमी आहे.
संविधान ही शोभेची वस्तू नाहीदेशाने संविधान स्वीकारले, त्यास ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. पण, अजूनही संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली, असे म्हणता येत नाही. देशातील शोषित, पीडित, वंचित समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय-अत्याचार होतच आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करायला हवा. संविधान ही कपाटात ठेवण्याची शोभेची वस्तू नाही, असे विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते सचिन निकम म्हणाले.