लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यात ठिकठिकाणी ६०० अंगणवाड्यांसाठी ६ लाख रूपये खर्चून स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहेत़ मात्र वर्ष उलटले तरी जिल्ह्यातील मंजूर अंगणवाड्यांच्या बांधकामांना अद्याप सुरूवातच झाली नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाड्या उघड्यावर, देवालय, समाजमंदिर, खाजगी इमारतीत भरविल्या जात आहेत़ जिल्ह्यात २०१६-१७ साठी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते़ यावेळी ९०० प्रस्ताव प्राप्त झाले होते़ त्यापैकी ६०० प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत़ किनवट व माहूर या तालुक्यातील अंगणवाड्यांना प्रत्येकी साडेसहा लाख रूपये तर इतर तालुक्यातील अंगणवाड्यांना ६ लाख रूपये बांधकामासाठी निधी देण्यात येणार आहे़ या अंगणवाडी इमारतीत किचनशेड, शौचालय बांधले जाणार आहेत, परंतु या अंगणवाडी बांधकामांना अद्याप सुरूवातच झाली नाही़ शासनाच्या नवीन धोरणानुसार मंजूर झालेल्या अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी आता नवीन रचना तयार करण्यात येत आहे़, परंतु ते तयार करण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ पायाभूत शिक्षण दर्जेदार देण्यासाठी अंगणवाड्यांचे स्वरूप बदलण्यात येणार आहे़ मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही़ आजही वस्ती, वाडे, तांडे, ग्रामीण भागात गोरगरिबांची मुले उघड्यावर अक्षरे गिरवताना दिसत आहेत़काही गावांत समाजमंदिर, मंदिरात अंगणवाड्या भरविण्यात येतात़ तसेच काही ठिकाणी खाजगी इमारत भाड्याने घेऊन अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत, परंतु या खाजगी इमारतींचे भाडे अनेक महिन्यांपासून रखडले आहे़ त्यामुळे इमारत मालकांनी या अंगणवाड्यांची जागा खाली करण्यास सांगितले आहेत़ त्यामुळे अंगणवाड्यांची स्थिती नाजूक झाली आहे़ पावसाळ्यात अंगणवाड्यांची परिस्थिती अत्यंत अवघड होत आहे़ अंगणवाडी बांधकामासाठी तालुकानिहाय आलेले प्रस्ताव पुढीलप्रमाणे- किनवट- ३५, मुखेड -६३, देगलूर -११९, बिलोली- ४८, कंधार - ६९, भोकर-२४, हदगाव -१७८, नांदेड-९५, लोहा- १३७, नायगाव- ५८, माहूर -३४, उमरी -१४, मुदखेड- १३, हिमायतनगर- ३१, धर्माबाद - १९, अर्धापूर-४६़
अंगणवाड्यांचे बांधकाम रखडले
By admin | Published: July 15, 2017 12:24 AM