--------------------------
रांजणगावात सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली
वाळूज महानगर : रांजणगावात सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची भीती नागरिकांतून वर्तविली जात आहे. येथील मुख्य बाजारपेठ व कमळापूर रस्त्यावर दुकानात व भाजीमंडईत खरेदीसाठी येणारे नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. व्याापाऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्याची भीती वर्तविली जात आहे.
---------------------------
दुभाजकावरील जाळ्यांची दुरवस्था
वाळूज महानगर : पंढरपुरातील रस्ता दुभाजकावर बसविण्यात आलेल्या संरक्षक लोखंडी जाळ्यांची दुरवस्था झाली आहे. या दुभाजकावर ठिकठिकाणी जाळ्या तुटल्या आहेत. दुभाजकावरील जाळ्या गायब झाल्याने नागरिक धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत असल्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे.
--------------------
शांतता समितीची बैठक
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवार (दि.२५) शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धूलिवंदन, शिवजयंती, शबे बरात आदी धार्मिक उत्सव साधेपणाने व घरच्या घरी साजरे करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या बैठकीला परिसरातील पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
-------------------------
भविष्यदीप नगरात गटारी तुंबल्या
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील भविष्यदीप नगरात नाल्या तुंबल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील गटार नाल्याची नियमितपणे साफ-सफाई केली जात नसल्यामुळे गटारी तुंबल्या आहेत. गटार नाल्याची सफाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून केली जात आहे.
--------------------------