छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील फूड पार्कनंतर आता दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरअंतर्गत बिडकीन औद्योगिक पट्ट्यात १६८ हेक्टरवर फूड पार्क उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीनंतर हे काम पूर्ण होण्याची शक्यता ऑरिक सिटीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.
देशातील पहिली नियोजित ग्रीनफिल्ड औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. यातील शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील दोन हजार एकर जमिनीपैकी ८५ टक्के भूखंड उद्योजकांना वाटप करण्यात आले आहे. यामुळे ऑरिक सिटी प्रशासनाने आता आपले लक्ष बिडकीन डीएमआयसीकडे केंद्रित केले आहे. बिडकीन औद्योगिक पट्ट्यामध्ये सुमारे आठ हजार एकर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. यापैकी १६८ हेक्टरवर फूड पार्क उभारण्याचा निर्णय गतवर्षी घेण्यात आला. यानंतर लगेच फूड पार्कसाठी रोड, भूमिगत इलेक्ट्रिकल केबल आणि इंटरनेट केबल, जलवाहिनी, ड्रेनेजलाइन, विद्युत रोहित्र आदी सुविधा देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. गतवर्षी फूड पार्कच्या कामाला सुरुवात झाली. दीड वर्षात फूड पार्कचे काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला देण्यात आली आहे. ठेकेदाराने युद्धपातळीवर हे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती ऑरिक सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
शेंद्रा पंचतारांकित नंतर ऑरिकमधील दुसरा फूड पार्क शंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये फूड पार्क आहे. या फूड पार्कमधील ५४ भूखंड अन्नप्रक्रिया उद्योगासाठी देण्यात आले आहेत. यातील यानंतर सर्वच भूखंडावर बांधकाम करून उद्योजकांनी उत्पादनही सुरू केले होते. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे येथील सुमारे ४० टक्के उद्योगांनी त्यांचे उत्पादन थांबविले. यातील काही उद्योजकांनी त्यांच्या भूखंडावर दुसरे उद्योग सुरू केले तर काहींनी भाडेतत्त्वावर दिले आहेत. तर काही भूखंड विनावापर पडून असल्याची माहिती आहे.