लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद: लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात जागतिक पातळीवरील सुसज्ज अशी ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती होईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया झाली असून नोव्हेंबरपासून निर्मिती सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी केली.
औरंगाबादेत पीटलाइनच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खा. इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदी उपस्थित होते.
अश्विनी वैष्णव म्हणाले, प्रारंभी महिन्यात तीन रेल्वे, त्यानंतर पाच रेल्वे, अशा टप्प्याटप्प्याने निर्मिती वाढविली जाईल. ‘वंदे भारत’ रेल्वे सध्या चेअर कार आहे. पुढे स्लीपर रेल्वेचीही निर्मिती केली जाईल, मराठवाड्यात जो भाग जोडलेला नाही, त्यांना ‘गती शक्ती’ योजनेंतर्गत जोडले जाईल. मराठवाड्यासाठी आवश्यक रेल्वे प्रकल्प देण्यासाठी वचनबद्ध आहे.
औरंगाबाद स्टेशनवर ‘रुफ प्लाझा’ औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील २०० स्टेशनवर ‘रुफ प्लाझा’ बनणार आहे. यात औरंगाबादेचाही समावेश आहे. यामध्ये एक एकर जागेत एकप्रकारे हवेत जमीन तयार करण्यात येणार आहे. त्यावर ‘रुफ प्लाझा’ असेल. रेल्वे रुळांवर छत असेल आणि त्या छतावर ‘वेटिंग एरिया’ असेल.
शिर्डीसाठी भारत गौरव यात्रा रेल्वे
साईबाबांवर आधारित भारत गौरव यात्रा रेल्वे दक्षिण भारतातून शिर्डीसाठी सुरू करण्यात आली आहे. धार्मिक, पर्यटन, ऐतिहासिक जागांसाठी भारत गौरव रेल्वे चालविण्यात येणार आहे, असे वैष्णव म्हणाले.
डिसेंबरपर्यंत धावणार विद्युत रेल्वे
डिसेंबरपर्यंत विद्युत रेल्वे धावेल. मनमाड ते औरंगाबादपर्यंतच्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचा ‘डीपीआर’ तयार झाला असून, तो रेल्वे बोर्डाला सादरही करण्यात आला आहे, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"