लातूर : भीषण पाणीटंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामे बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिले होते. तरीही शहरातील इतर बांधकामे बंद आहेत. मात्र पाणीपुरवठ्याशी संबंधित असणाऱ्या जलसिंचन विभागाने मात्र ऐन टंचाईच्या परिस्थितीत वाहनतळाचे बांधकाम बिनबोभाट सुरू केले आहे. लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिसरातील बहुतांश जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. परिणामी, डोंगरगाव, भंडारवाडी या प्रकल्पांतील पाणी टँकरने आणून तहान भागविण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. हे वास्तव असतानाही शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील जलसिंचन विभागाला मात्र अजूनही टंचाईची झळ लागली नसल्याचे तेथील सुरू असलेल्या बांधकामावरूनदिसून येत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. काही नागरिक टँकरद्वारे पाणी विकत घेऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावत आहेत. तर पाण्यासाठी ३५-४० रुपये प्रमाणे जार विकत घ्यावा लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही जलसंपदा विभागाने टंचाईच्या परिस्थितीत वाहनतळाचे काम सुरू करून टंचाईग्रस्त लातूरकरांची चेष्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे टंचाई परिस्थितीत जलसंपदा विभागाच्या वाहनतळावर मात्र पाण्याचे फवारे सुरू असल्याने लातूर शहरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बांधकाम प्रकरणातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर टंचाईत बांधकाम सुरू केल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सज्जाद पठाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
आदेश डावलून बांधकाम !
By admin | Published: April 01, 2016 12:52 AM