छत्रपती संभाजीनगर : बांधकाम परवानगीसाठी महापालिकेकडून विकास शुल्क वसूल करण्यात येते. सध्या १३८० रुपये प्रति चौरस मीटर दर आकारणी करण्यात येते. लवकरच यामध्ये दोन टक्के वाढ होणार आहे. २८ रुपये प्रति चौरस मीटरमागे वाढणार आहेत. म्हणजे १४०७ रुपये ६५ पैसे विकास शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव २ टक्के निधी महापालिका पर्यटन विकासासाठी खर्च करणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराला राज्य शासनाने पर्यटनाची राजधानी घोषित केले आहे. दरवर्षी शहरात ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. पर्यटकांना शहरात पाहिजे त्या सोयीसुविधा मिळत नाहीत. पर्यटन धोरण तयार करण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊल उचलले. शहरी भागातील ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व्हावे, म्हणून हेरिटेज कमिटी स्थापन केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती या कमिटीचे अध्यक्ष आहेत. पर्यटन वृद्धीसाठी मनपाकडून एक रुपयाही खर्च केला जात नाही. पर्यटनासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. या संदर्भात बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयात एक बैठक घेण्यात आली. बैठकीत हेरिटेज फंड उभारण्यासाठी विकास शुल्कात दोन टक्के वाढ करण्याचे आदेश प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिले. विकास शुल्क दोन टक्क्यांनी वाढणार असल्यामुळे बांधकाम परवानगी आता महागणार आहे. बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
१३८० रुपये प्रति चौरस मीटरमहापालिकेतर्फे सध्या १३८० रुपये प्रति चौरस मीटर या दराने विकास शुल्क आकारले जाते. त्यात २ टक्के वाढ झाल्यास २८ रुपये प्रति चौरस मीटरमागे वाढणार आहेत. म्हणजे १४०७ रुपये विकास शुल्क आकारले जाणार आहे. एक हजार चौरस फुटाच्या प्लॉटसाठी आतापर्यंत सुमारे ४२ हजार रुपये विकास शुल्क आकारले जात होते, आता त्यात किमान दीड हजार रुपये वाढ होईल, असे वास्तुविशारदांचे म्हणणे आहे.