वैजापूर : तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारतीचे बांधकाम तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेले आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने या इमारतीचे भिजत घोंगडे ठेवले आहे. परंतु, दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही गेल्या नऊ वर्षांमध्ये संबंधित विभागाला विचारणा केली नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या जुन्या इमारतीसह चिकित्सालयात असलेल्या औषधीच्या तुटवड्यामुळे हा दवाखाना नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जुन्या इमारतीस अवकळा आल्याने ती धोकादायक झाली आहे. ज्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना बसण्याची पंचाईत आहे, तिथे जनावरांसाठी काय व्यवस्था असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. याशिवाय, परिसरात घाणीच्या साम्राज्यासह रिक्त पदांमुळे चिकित्सालय समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.
शहरातील येवला रस्त्यावर असलेल्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ९३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. या नवीन इमारतीत बाह्यरुग्ण विभागासह शस्त्रक्रिया कक्ष, भांडारगृह, प्रतीक्षालय, प्रसाधनगृह, अधिकाऱ्यांसाठी दोन व कर्मचाऱ्यांसाठी एका कक्षाचा समावेश आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान गेल्या सहा वर्षांपासून या इमारतीचे काम बंद आहे. औरंगाबाद येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत कामाचा सर्व निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला आहे. त्यामुळे निधीची कोणतीही अडचण नसताना इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास जायला तयार नाही. केवळ ठेकेदाराच्या चालढकलपणामुळे या इमारतीचे बांधकाम रेंगाळले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित हे बांधकाम सुरू आहे.
-----
अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा
नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या इमारतीचे बांधकाम कधी पूर्णत्वास जाते, हे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागालाच ठाऊक आहे. या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या ज्या शाखा अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनाच हे काम नेमके कशामुळे बंद पडले, याची माहिती नाही. यापेक्षा हास्यास्पद बाब आणखी कोणती असू शकते. काम नेमके कशामुळे बंद पडले. हे मला संचिकेचा अभ्यास करून सांगावे लागेल, अशी बेजबाबदारपणाची उत्तरे शाखा अभियंता देतात.
८५ हजार जनावरांचा प्रश्न अंधारात
वैजापूर तालुक्यात जवळपास ८५ हजार लहान-मोठी जनावरे आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना अशीच अवकळा आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी अधून-मधून फिरकत असतात. परंतु, फिरकले तरी पशुपालकांना जुमानत नाहीत. कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी उपचाराची सुविधा उपलब्ध असू नये, यापेक्षा भयावह चित्र आणखी काय असू शकते? जनावरे म्हणजे शेतकऱ्यांचे वैभव असते.
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज
शेती व्यवसायात यांत्रिकीकरण झाले असले तरी आजही बहुतांश शेतकरी जनावरांच्या जीवावर शेती करतात. जनावरे आजारी पडली तर त्यांना उपचारासाठी डाॅक्टर उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे उपचाराअभावी तडफडून मरणाऱ्या जनावरांची संख्या तालुक्यात कमी नाही, हे विदारक सत्य आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या उपचारासाठी सुसज्ज, औषधांचा पुरेसा साठा व सोयीसुविधायुक्त इमारतीसह कर्तव्यदक्ष सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. याकडे लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
----
फोटो कॅप्शन वैजापूर शहरातील येवला रस्त्यावरील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या याच इमारतीच्या बांधकामाचे तब्बल सात वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे.
160921\1420img-20200903-wa0000.jpg
फोटो