माजलगाव :येथील धरणाच्या भिंतीलगत संपादित केलेल्या जागेचा वाद न्यायप्रविष्ठ असताना संबंधीत अनधिकृतरित्या खरेदी- विक्री व्यवहार करुन बांधकाम सुरु केले होते. रविवारी महसूल प्रशासनाने हे बांधकाम बंद पाडले. जायकवाडीचा दुसरा टप्पा असलेल्या माजलगाव धरणासाठी शासनाने ३५ वर्षांपूर्वी परिसरातील ३० गावच्या जमिनी संपादित करुन मावेजाही दिला होता. मात्र जायकवाडी प्रकल्पाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी संपादित भूखंडावर मूळ मालकांचीच सातबारावर नोंद आहे. भाटवडगांव शिवारातील गट क्र. १७३ सर्वे क्र. ८४१ मध्ये पूूर्वी पाटबंधारे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व एक मोठे गोदाम उभारले होते. ही जागा कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गाला चिकटून आहे. मूळ मालकाने हा भूखंड बेकायदेशीरपणे अॅड. शेख खलील यांना २०१३ मध्ये विक्री केला. अॅड. शेख यांनी त्या जागेवर प्लॉटिंग केली. त्यानंतर त्यांनी शेख शफीक शेख हसन यांना दोन प्लॉट विकले. त्यांनी तेथे घराचे बांधकाम सुरु केले. या अवैध बांधकामाची मातिी मिळताच उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह तेथे धाव घेतली. सोबत जेसीबीही नेला होता. सदरील बांधकाम तत्काळ थांबविण्याच्या सूचना कांबळे, जऱ्हाड यांनी दिल्या. मात्र, सुरुवातीला टाळाटाळ झाली. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अखेर हे बांधकाम रोखण्याची प्रक्रिया पूर्ण करुन अधिकारी परतले. (वार्ताहर)
वादग्रस्त जागेवरील बांधकाम महसूल विभागाने पाडले बंद
By admin | Published: March 14, 2016 12:06 AM