वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहे. त्रस्त ग्राहकांनी बुधवारी (दि. ९) महावितरणच्या नारेगाव कार्यालयात अधीक्षक अभियंता संजय अकोडे यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचला.
या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या वडगाव, तीसगाव, सिडको वाळूज महानगर, साऊथ सिटी, आदी भागात सतत वीज पुरवठा खंडित होतो आहे. या भागात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, यासाठी ग्राहकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय आकोडे यांच्या नारेगाव कार्यालयात भेट घेऊन समस्या मांडल्या. सिडको महानगरात ग्राहकांची संख्या वाढल्याने विजेचा वापरही वाढला आहे. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाटोदा उपकेंद्रांवरून वीज पुरवठा करण्याची मागणी केली. याचबरोबर परिसरात नवीन उपकेंद्र उभारणे, ग्राहकांच्या तुलनेत वायरमन व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, भूमिगत केबल वायर टाकणे व विद्युत डीपींना संरक्षक जाळी व भिंत बांधणे, ओव्हरलोड डीपीवरील विजेचा भार कमी करणे, आदी मागण्या तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारी, नरेंद्र यादव, मारुती गायकवाड, उदय देशमुख, अलेश संत्रे, सचिन तांबे, आदींनी केल्या. अकोडे यांनी ग्राहकांच्या तक्रारी समजून घेत टप्प्याटप्प्याने समस्या सोडविण्याचे, तसेच सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत तोडकर, सहायक अभियंता सचिन उखंडे, आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ - महावितरणच्या नारेगाव कार्यालयात अधीक्षक अभियंता संजय अकोडे, कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत तोडकर यांच्यासमोर तक्रारी मांडताना तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, नरेंद्र यादव, मारुती गायकवाड, आदी उपस्थित होते.
फोटो क्रमांक- मिटींग १/२
---------------------------