औरंगाबाद : युवा सेनेत नाराजांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या शुक्रवारी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत अनेकांना डावलल्यामुळे तिन्ही मतदारसंघांसह ग्रामीण भागातील नाराजांनी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
युवा सेनेत ज्यांना स्थान मिळाले, ते सर्व संघटनेतील लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकाऱ्यांचे चिरंजीव, नातेवाईक आहेत. एखाद-दुसरा वगळला तर युवा सेना थेट उत्तराधिकारी सेना झाल्याचे दिसते आहे. निवड झालेल्यांची यादी शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर नाराजांमध्ये खदखद वाढली, अनेकांनी सोशल मीडियातून राग व्यक्त केला. पदाधिकारी निवडताना कुणाचा वरचष्मा आहे, यापेक्षा काम करणाऱ्यांना डावलून मर्जीनुसार निवड झाल्याची खंत अनेकांनी शिवसेना नेत्यांकडे व्यक्त केली. शिवसेनेतील स्थानिक पातळीवर असलेल्या दोन गटांच्या राजकारणात तिसऱ्याने बाजी मारून आपली यादी तयारी करून तीच अंतिम करून घेतली असली तरी ज्याने युवा सेनेत हे सगळे महाभारत घडविले, त्याला कोणते पद मिळाले हे अद्याप स्पष्ट नाही. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. शहरातील नाराज कार्यकर्ते ‘भाजयुमो’च्या संपर्कात असून ते लवकरच गळाला लागतील, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. फुलंब्री, कन्नड, गंगापूरमधील अनेक नाराज देखील भाजयुमोच्या संपर्कात आहेत. दरम्यान, नाराजांना युवा सेनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संपर्क करून एखादे पद देण्याचे आमीष दाखविल्याची चर्चा आहे.
भाजयुमोचा दावा असा
भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष राजगौरव वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. येत्या काही दिवसांत भाजयुमोची ताकद शहर आणि ग्रामीण भागात वाढलेली दिसेल.