औरंगाबाद : खुलताबादला होत असलेल्या दूषित, दुर्गंधीयुक्त आणि पिण्यासाठी अयोग्य पाणी पुरवठ्यासंदर्भात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या.आर. एन. लड्डा यांनी राज्याचे मुख्य सचिव, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे सचिव, औरंगाबादचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि खुलताबाद नगर परिषदेचे अध्यक्ष यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. याचिकेची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार आहे.
खुलताबादला काही महिन्यापासून दूषित, दुर्गंधीयुक्त आणि पिण्यासाठी अयोग्य पाणी पुरवठा होत असल्यासंदर्भात नागरिकांनी नगर परिषद आणि इतर वरिष्ठांना तक्रारी केल्या. तरीही परिषदेतर्फे कोणतीही कार्यवाही झाली नाही. शेवटी शेख अब्दुल माजीद अब्दुल मेहमूद यांनी ॲड. सूरज गोठवाल यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे. ॲड. गोठवाल यांना ॲड. रुपाली गोठवाल (राजपूत) आणि ॲड. साईसागर अंबिलवादे सहकार्य करीत आहेत.