औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत सोमवारी एका बैठकीत चिंतन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अपर जिल्हधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती.
म्युकरमायकोसिस आणि बालकोविडसाठी तयारी
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत म्युकरमायकोसिस या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी आवश्यक औषध, इंजेक्शनची उपलब्धता जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ठेवण्यासाठी शासनाकडे इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात येत आहे. प्राप्त इंजेक्शन रुग्णालयांना वितरित करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी व लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाढीव उपचार सुविधा तयार करण्यात येत असून, गरवारे कंपनी परिसरात बालउपचार केंद्राची माहिती डॉ. गव्हाणे यांनी दिली.
बालकोविडसाठी मनपाची तयारी अशी
मनपा आयुक्त पांडेय म्हणाले, शहरात संसर्ग आटोक्यात येत असून, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. बालरोगतज्ज्ञांसोबत बैठका घेऊन लहान मुलांच्या उपचाराबाबत नियोजन सुरू आहे. मनपा लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करणार आहे.
व्यापाऱ्यांकडून कारवाई मागे घेण्याची मागणी
व्यापारी महासंघ प्रतिनिधी आणि पेट्रोलपंपचालकांनी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांची भेट घेऊन लॉकडाऊन अंतर्गत होत असलेली कारवाई मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, डॉ. गव्हाणे यांनी सांगितले, व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ माझ्याकडे आले होते. त्यांना महापालिका प्रशासनाला भेटण्याची सूचना केली. नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी शिष्टमंडळाला केले.
चौकट...
लग्नसमारंभाबाहेर पोलीस नेमा
५० खाटा असलेल्या सर्व शहरी, ग्रामीण भागातील रुग्णालयांना स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बंधनकारक करण्याची सूचना आ. सावे यांनी केली. म्युकरमायकोसिस उपचारासाठी इंजेक्शन उपलब्ध करण्याची, लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याची मागणी आ. बागडे, आ. बोरनारे यांनी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. लग्नसमारंभाच्या ठिकाणी नियमांचे पालन होण्यासाठी पोलीस नेमण्याची सूचना आ. दानवे यांनी केली.