\Sऔरंगाबाद : तलाठी भरतीसंदर्भातील प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे दाखल अवमान याचिकेवर ११ जानेवारी २०२१ रोजी न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठात अंतिम सुनावणी होणार आहे.
सुनावणीच्या तारखेबाबत रजिस्ट्री कार्यालयामार्फत अधिकृत माहिती वजा नोटीस प्रतिवादींना बजावण्याची मुभा आणि निर्देश न्यायाधिकरणाने बुधवारी (दि.२५) अर्जदाराला दिले आहेत. अर्जदाराने याचा पूर्तता अहवाल शपथपत्रासह सुनावणीच्या तारखेपूर्वी दाखल करावा, असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.
तलाठी भरती प्रक्रियेसंदर्भात प्रकाश हसनाबाद आणि दत्ता चेके यांनी मूळ अर्ज दाखल केले होते. प्रशासकीय न्यायाधिकरणाने तलाठी निवड प्रक्रिया ४ आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश २१ सप्टेंबर २०२० रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष यांना दिले होते; परंतु या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे अर्जदारांनी ॲड. पंडितराव अणेराव यांच्या मार्फत दोन स्वतंत्र अवमान याचिका दाखल केल्या आहेत. शासनातर्फे मुख्य सादरकर्ता अधिकारी मिलिंद महाजन काम पाहत आहेत.