छत्रपती संभाजीनगर : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी निवडणुकीत औरंगाबादलोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत होईल, अशी चिन्हे आहेत. महाआघाडी आणि महायुतीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटेल, याबद्दल आतापासूनच तर्कवितर्क सुरू आहेत. लोकसभा उमेदवारीच्या तयारीत एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, शिवसेना उबाठाचे चंद्रकांत खैरे यांची लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दिशेने तयारी सुरू असल्याचे जाणवत आहे.
महाआघाडी, युतीत अनेक दावेदारमहायुतीभाजप : विद्यमान केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवा, असा आदेश आल्याची चर्चा आहे. त्यानुसार ते कामाला लागले आहेत.शिवसेना शिंदे गट : राज्याचे रोहयो मंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.अजित पवार गट : मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.
महाआघाडीकाॅंग्रेस : डॉ. कल्याण काळे, माजी आमदार सुभाष झांबड व अन्य काही दावेदार असू शकतात.शरद पवार गट : शरद पवार गटाकडून तसे कोणतेही नाव समोर आलेले नाही. वेळेवर काही सांगता येत नाही.उद्धव ठाकरे गट : शिवसेना उबाठाचा प्रबळ दावेदार म्हणून माजी खासदार चंद्रकात खैरे यांचेच नाव घेतले जात आहे. पण सोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याही नावाची चर्चा होत असते.इतर पक्षही तयारीत: बीआरएस, आम आदमी पार्टी यासारखे पक्षही उमेदवार उभे करू शकतात.
नेते काय म्हणतात?
महाविकास आघाडीत ही जागा काॅंग्रेसला सुटली पाहिजे, यासाठी प्रयत्न चालू आहेत. - शेख युसूफ, शहराध्यक्ष, काॅंग्रेस
मला निवडणूक लढवायला सांगितलेली आहे. मी तयारीला लागलोय. - डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री
महाविकास आघाडीत औरंगाबादऐवजी जालना लोकसभा आम्ही मागतोय. माजी आमदार संजय वाघचौरे हे आमचे उमेदवार राहतील. - पांडुरंग तांगडे पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शरद पवार गट
मागील पाच वर्षांपासून आमची तयारी चालूच आहे. - खा. इम्तियाज जलील, एमआयएम
आमच्याकडेही उमेदवार आहेत. आमचीही तयारी चालू आहे. - कैलास पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस, अजित पवार गट आम्ही तर निवडणुकांची वाट पाहतोय. कोणतीही निवडणूक आली तर तयारच आहोत. लोकसभेसाठी उमेदवारी कुणाला द्यायची, हा निर्णय पक्ष घेईल. - किशू तनवाणी, महानगरप्रमुख, शिवसेना उबाठा
शिवसेना शिंदे गटाचीही तयारी चालू आहे. संदीपान भुमरे हे आमचे उमेदवार आहेत. - रमेश पवार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना शिंदे गट