औरंगाबाद : मिटमिटा येथील १०० एकर जागेवर सफारी पार्क उभारले जाणार असून, तेथे सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय स्थलांतरीत करण्यात येणार आहे. नियोजित सफारी पार्कच्या जागेवर भव्य संरक्षण भिंत उभारणीचे काम मागील काही दिवसांपासून सुरू झाले आहे. तब्बल ४ कि.मी. लांब ही भिंत उभारली जाणार असून, १२ फूट उंचीची आहे. या कामावर स्मार्ट सिटीतून जवळपास ११ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात प्राण्यांना जागा अपुरी पडत असल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने आक्षेप घेतला आहे. प्राण्यांना नैसर्गिक वातावरणच हवे, असा आग्रह प्राधिकरणाने धरला आहे. महापालिकेने सफारी पार्कसाठी मिटमिट्यातील गटनंबर ३०९ मधील १०० एकर जागा महसूल प्रशासनाकडून ताब्यात घेतली. जंगल सफारी पार्क उभारण्यासाठी दिल्ली येथील प्राणिसंग्रहालयाचे माजी संचालक असलेले बी. आर. शर्मा यांच्या एजन्सीची पीएमसी म्हणून नियुक्ती केली. पीएमसीने सफारी पार्कचा प्रकल्प आराखडा तयार करून केद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर केला. प्राधिकरणाने आराखड्यातील त्रुटी काढल्या. या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर आराखड्यास मंजुरी मिळाली. सफारीपार्कसाठी अतिरिक्त ५८ हेक्टर जमिनीचा प्रस्ताव तयार केला जात असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. सफारी पार्कसाठी स्मार्ट सिटी योजनेतून १४७ कोटीच्या निधीची तरतूद केली असून, त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे. राज्य शासनाकडूनही काही निधी मिळाल्यास आणखी सोयी-सुविधा व्यापक प्रमाणात करण्यात येणार आहेत.
सफारी पार्क तीन टप्प्यात उभारले जाणार असून, पहिल्या टप्प्यात शंभर एकर जागेचे सपाटीकरण आणि संरक्षण भिंत उभारण्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली.
संरक्षण भिंतीचे काम सुरू
सफारी पार्कच्या जमीन सपाटीकरणासह संरक्षण भिंतींचे ४२५० मीटर बांधकामाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सिमेंट काँक्रिटची १२ फूट उंच भिंत बांधण्यात येत असून, त्यावर तारेचे कुंपन असणार आहे. एक किमीपर्यंत काम पूर्ण झाले आहे. १५ महिन्यांत हे काम पूर्ण होईल.