औरंगाबाद : महापालिकेच्या कारभाराची ‘आर्थिक’ गणिते सांभाळणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. स्थायीत सेनेचे सहा सदस्य आहेत. त्यातील एकाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार हे निश्चित असले तरी प्रत्येक नगरसेवक श्रेष्ठींमार्फत जोरदार फिल्ंिडग लावत आहे. ‘मातोश्री’वर कोणाचे नाव अंतिम होईल, याकडे सेनेचे लक्ष लागले आहे. महापालिकेत शिवसेना-भाजपची युती आहे. युतीमधील करारानुसार यंदा सभापतीपद सेनेच्या वाट्याला आले आहे. सहा महिन्यांनंतर भाजपला आपला महापौर करायचा आहे. त्यामुळे युतीमधील संबंध ‘मधुर’असावेत, असे दोन्हीकडील नेत्यांना वाटत आहे. भाजपला यंदा स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत एमआयएम, बारवाल आघाडीशी हातमिळवणी करणे अजिबात परवडणारे नाही. त्यामुळे भाजपही सेनेचाच सभापती होणार असल्याचे सांगत आहे. एमआयएमने स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी कितीही राजकीय डावपेच खेळले तरी युतीला फारसा फरक पडणार नसल्याचे दोन्हीकडील नेते सांगत आहेत.स्थायी समितीसाठी सेनेकडून नंदू घोडेले, राजू वैद्य आणि विकास जैन इच्छुक होते. अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाने तिन्ही दिग्गजांना बाजूला सारून सीताराम सुरे यांना संधी दिली. आता सभापतीपदाच्या शर्यतीत मोहन मेघावाले शड्डू ठोकून उतरले आहेत. सीताराम सुरे सुरेवाडीतून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनीही सभापतीपदासाठी फिल्ंिडग लावणे सुरू केले आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच नगरसेवक झालेले गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, रावसाहेब आमले यांचीही लॉटरी लागू शकते.स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्यासाठी मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना तारीख मागितली आहे. उद्या सोमवारी विभागीय आयुक्तांकडून तारीख निश्चित होईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सचिव दिलीप सूर्यवंशी यांनी सांगितले.
सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू
By admin | Published: May 16, 2016 12:13 AM