औरंगाबाद : घाटीत काम करणाऱ्या दीडशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी करत, चार महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र कामगार कर्मचारी युनियन संलग्न आयटकतर्फे या कोरोना योद्ध्यांना प्राधान्याने विशेष बाब म्हणून सेवेत सामावून घ्यावे व उर्वरित जागांसाठी खुली भरती करावी, अशी मागणी राज्य सेक्रेटरी अभय टाकसाळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जानेवारी, फेब्रुवारी, २०२०च्या पगार न मिळाल्याने संघटनेने यापूर्वीही १४८ दिवस उपोषण केले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. आता या दीडशे कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी हे आंदोलन शुक्रवारी सुरू केले. यावेळी दिलेल्या निवेदनात, टाकसाळ यांनी घाटी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कर्मचारीविरोधी प्रशासन वागत असल्याचे म्हणत, कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या या कामगारांना अद्यापही कोरोनाची लस देण्यात आलेली नाही, म्हणून नंदा हिवराळे, संगीता शिरसाठ, मनिषा हिवराळे, नीता भालेराव या उपोषणाला बसल्या आहेत. निवेदनावर टाकसाळ यांच्यासह विकास गायकवाड, रतन अंबिलवाद, भालचंद्र चौधरी, महेंद्र मिसाळ, किरणराज पंडित आदींच्या सह्या आहेत.