घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन रखडले
औरंगाबाद : घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेवर करण्यात यावे, अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याकडे केली आहे. १६ तारीख उजाडली तरी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवेदनावर ॲड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, किरण पंडित, भालचंद्र चौधरी, गजानन खंदारे, महेंद्र मिसाळ, अभिजित बनसोडे, श्रीयोग वाघमारे, बंटी खरात, गौतम शिरसाठ, संगीता शिरसाठ, अतिश दांडगे, संदीप पेढे, सुनील खरात यांची नावे आहेत.
कृषिपंपांचे नुकसान टाळण्यासाठी
कपॅसिटर बसवा, ऑटोस्विच काढा
औरंगाबाद : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तात्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद अथवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे, तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
जिल्हा रुग्णालयातील
२७२ खाटा रिकाम्या
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३०० पैकी २७२ खाटा सध्या रिकाम्या आहेत. याठिकाणी केवळ २८ रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे रुणालयावरील रुग्णसेवेचा भार कमी झाला आहे. नियमित ओपीडी सेवा कधी सुरू होते, याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनाही
पोशाखासंदर्भात सूचना
औरंगाबाद : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात परिधान करण्याच्या पोशाखासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार दैनंदिन पेहराव कर्मचाऱ्याचा असावा, असे एका परिपत्रकाद्वारे विभागीय कार्यालयास सूचना करण्यात आली आहे. याचे पालन किती होते, याकडे आता लक्ष लागले आहे.